Mumbai: पोलिसांनी डोंगरीतून दोघा झाकणचोरांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:45 AM2023-06-29T08:45:38+5:302023-06-29T08:46:02+5:30
Mumbai: गटारांवरची मॅनहोल्सची लोखंडी झाकणे पैशासाठी चोरल्याने, मॅनहोल्सवर झाकणे नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे जीव धोक्यात येतात. यावर न्यायालयाने दिलेल्या गांभीर्यपूर्ण आदेशानंतर आता पालिकेला जाग आल्याचे दिसत आहे.
मुंबई : गटारांवरची मॅनहोल्सची लोखंडी झाकणे पैशासाठी चोरल्याने, मॅनहोल्सवर झाकणे नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे जीव धोक्यात येतात. यावर न्यायालयाने दिलेल्या गांभीर्यपूर्ण आदेशानंतर आता पालिकेला जाग आल्याचे दिसत आहे. गावदेवी पोलिसांनीही दोन झाकणचोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
गावदेवी पोलिसांनी सीसीटीव्ही, सीडीआरच्या मदतीने दोघांना डोंगरी परिसरातून अटक केली आहे. यामध्ये मुंब्रा येथील सगीर अब्बास सयद (२२), वरळीचा इरफान शेख (२३) यांचा समावेश आहे. दोघांविरोधात वरळी, माहीम, एल टी मार्ग ठाणे असे ४ गुन्हे नोंद आहे. त्यांच्याकडून
३ मॅनहोलची झाकणे हस्तगत केली. आरोपींना २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
पुन्हा मॅनहोलच्या झाकणाची चोरी
एम. एच. बी. कॉलनी पोलिसांनी दोन डझन मॅनहोलची झाकणे चोरणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर दहिसर पोलिस ठाण्यातही पालिकेच्या आर उत्तर विभागाकडून मलनिसारण प्रचालन निरीक्षक पदावर काम करणाऱ्या स्वप्नील लोखंडे (३५) यांनी मॅनहोल झाकणाच्या चोरीची तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते १५ जून रोजी केतकीपाडा परिसरात दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पाहणी करताना दहिसर चेक नाक्याजवळ असलेल्या सर्वोदय इंजिनिअरिंग समोरील रस्त्यावर गटाराचे झाकण गायब होते. लोखंडे यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाही. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी दहिसर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चोराचा शोध घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.