Urfi Javed : उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 09:42 AM2023-01-14T09:42:48+5:302023-01-14T09:44:46+5:30
Urfi Javed Controversy : मुंबईतील अंबोली पोलिसांनी आज (दि.14) हजर राहण्यास सांगितले आहे.
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दोघीही एकमेकींवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर कित्येक दिवस या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नव्हती, पण आता पोलिसांनी याची दखल घेत उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी आज (दि.14) हजर राहण्यास सांगितले आहे.
सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला आज आंबोली पोलिस ठाण्यात हजर होण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दाखल घेत तिला असे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका करत तिची पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच, काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडियावर युद्ध सुरू आहे. तसेच, चित्रा वाघ यांच्या तक्रारीमुळे उर्फी जावेदच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आज उर्फी जावेद हजर झाल्यानंतर तिला पोलिसांनी अटक केल्यास हे वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. आता उर्फी जावेद काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काल उर्फी जावेदने महिला अयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. तेव्हा तिच्यासोबाबत तिचे वकील सुद्धा उपस्थित होते.