पोलिसाची दादागिरी! फुकट जेवण आणि दारू देण्यास नकार दिल्यामुळे कॅशिअरला मारहाण, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 08:01 PM2021-12-24T20:01:41+5:302021-12-24T20:01:47+5:30
मुंबई लगतच्या वाकोला परिसरात एका हॉटेलच्या कॅशियरला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी आरोपी अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुंबई:मुंबई लगतच्या वाकोला परिसरात बुधवारी एका हॉटेलच्या कॅशियरला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला. त्यानंतर आता त्या मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक विक्रम पाटील हॉटेलच्या कॅशिअरला मारहाण करताना दिसत आहेत.
काय आहे आरोप ?
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरात महेश शेट्टी यांचे स्वागत बार नावाचे हॉटेल आहे. बुधवारी रात्री त्यांनी हॉटेल बंद केले होते. पण, त्यानंतर रात्री सहाय्यक उपनिरीक्षक विक्रम पाटील बारमध्ये आले आणि त्यांनी फुकट जेवण आणि दारू मागितली. पण, बारच्या कॅशिअरने बार बंद झाल्याचे सांगितले असता, विक्रम पाटील यांनी कॅशिअरला शिवीगाळ करत मारहाण केली. ही संपूर्ण घटना बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
या घटनेनंतर रस्वागत बारचे मालक महेश शेट्टी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. आपल्या तक्रारीत शेट्टी म्हणाले की,बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास साध्या वेशातील काही पोलिस मागच्या दाराने रेस्टॉरंटमध्ये घुसले. रेस्टॉरंट बंद होते आणि बहुतेक कर्मचारी घरी गेले होते. कर्मचारी घराकडे निघाल्याचे सांगताच विक्रम पाटील यांनी कॅशिअर रामदास पाटील (41) यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. या घटनेनंतर पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी आरोपी अधिकाऱ्यावर कारवाई सुरू झाल्याचे सांगितले. ज्या पोलीस ठाण्यात विक्रम पाटील तैनात आहेत, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.