पेट्रोलिंग बोट, इंजिनात खोट! पोलिसांच्या गस्ती नौकेला दुबई पोलिसांचे भंगार इंजिन, मोठा घोटाळा उघड
By मनीषा म्हात्रे | Published: August 22, 2022 05:34 AM2022-08-22T05:34:17+5:302022-08-22T05:35:02+5:30
रायगडच्या समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोटीने खळबळ उडवून दिल्याने समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला. लागोपाठ ‘पुन्हा २६/११ करू’च्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत अधिकच भर पडली.
मनीषा म्हात्रे
मुंबई :
रायगडच्या समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोटीने खळबळ उडवून दिल्याने समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला. लागोपाठ ‘पुन्हा २६/११ करू’च्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत अधिकच भर पडली. याचवेळी समुद्रकिनारी गस्त घालणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीला दुबई पोलिसांनी भंगारात काढलेले इंजिन लावल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या आदेशाने राज्य गुप्तचर विभागाच्या कोस्टल पोलिसांकडून मोटार परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीच्या फेऱ्यात एक आयपीएस अधिकारीही अडकले आहे. येत्या काही दिवसांत अनेक बडे अधिकारी यात अडकण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
७.३ कोटींचा घोटाळा
गोवा शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडद्वारा निर्मित २८ पेट्रोलिंग बोटी घेण्यात आल्या.
२०११-१२ मध्ये राज्य सरकारने आणखी २९ बोटी खरेदी केल्या.
चांगले इंजिन गुजरातच्या भंगारवाल्याला
यामध्ये २४ इंजिन मिसिंग होते. मुंबई पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीतील चांगले इंजिन गुजरातमधील भंगारवाल्याला विकल्याची माहिती समोर आली. या भंगारवाल्याचा पोलीस शोध घेत आहे.
चार इंजिनचे क्रमांकही गायब...
१३ बोटचे १७ इंजिन आपापसांत बदलले. चार इंजिनचे क्रमांक खोडले असल्यामुळे ते कुठून आणले. याबाबत माहिती समजू शकलेली नाही. याबाबत तपास सुरू आहे.
अधिक तपास सुरू ...
पेट्रोलिंग बोट घोटाळ्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांच्याकडे विचारणा करताच त्यांनी अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.
ऑगस्ट २०१८ मध्ये एका नवीन देखभाल कंत्राटदाराकडून मिळालेल्या माहितीने या घोटाळ्याकडे लक्ष वेधले. कराराच्या वेळी बोटीमधील इंजिन वेगळे असल्याची माहिती देण्यात आली. राज्य सरकारने १ जानेवारी २०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) चौकशी करण्याचे आदेश दिले.
एसीबीचे अतिरिक्त महासंचालक, प्रभात कुमार यांनी चौकशी केली आणि ३० मार्च रोजी अहवाल सादर केला.
अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांच्या फिर्यादीवरून यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे पोलिसांनी एक्वेरियस शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर दांडेकर यांच्यासह अज्ञात अधिकारी आणि कर्मचारी, गोवा शिपयार्डचे व ब्रिलियंट सिगलचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.पुढे, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीला आला. सध्या त्यांच्याकडून तपास सुरू आहे.
२८ पेट्रोलिंग बोटी घेतल्या
६/११ च्या हल्ल्यानंतर किनारपट्टीची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी ५७ पेट्रोलिंग बोट घेण्यात आल्या. यात गोवा शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडद्वारा निर्मित २८ पेट्रोलिंग बोटी केंद्राने दिल्या. २०११-१२ मध्ये राज्य सरकारने २९ बोटी खरेदी केल्या. ऑगस्ट २०१८ मध्ये एका नवीन देखभाल कंत्राटदाराकडून मिळालेल्या माहितीने या घोटाळ्याकडे लक्ष वेधले.
असा उघडकीस आला घोटाळा
पोलीस तक्रारीनुसार, २०१४ ते २०१९ पर्यंत २९ गस्ती नौकांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राट गोवा शिपयार्ड लिमिटेडला देण्यात आले होते. २०१८ -१९ दरम्यान बोटींच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी दांडेकर यांची कंपनी कार्यक्षम नव्हती.तरीही, इंजिन देखभाल व ओव्हरहॉलिंगसाठी वर्क ऑर्डरची मुदतवाढ मिळाली.
तीन मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर्सने काही सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोस्टल पोलिसिंग बोटींची शक्तिशाली इंजिन काढून फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच दांडेकरांच्या फर्मने ब्रिलियंट सीगल प्रा.लिचे मनुष्यबळ वापरल्याचाही आरोप आहे.
असा होता वेग
जिथे पेट्रोलिंग बोट प्रतितासाला ४५ नॉटिकल मैल (८३ किलोमीटर) जाते, तिथे ही बोट तेवढ्या वेळेत अवघे १० नॉटिकल मैलपर्यंत पोहोचत होती.
सेकंड हँड इंजिन घेतले
तपासामध्ये २१ सेकंड हॅण्ड इंजिन होते. पोलीस तपासात काही इंजिन यूएई, दुबईतून आणले. तेथील जुन्या बोटचे खराब झालेल्या इंजिनाचा यात समावेश होता. तसेच दुबई पोलिसांनी भंगारात काढलेल्या एका इंजिनाचाही एका पेट्रोलिंग बोटीत वापर केल्याचे समोर आले. हे इंजिन पोलिसांनी जप्त केले, आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.