Join us  

मुंबईत अलर्ट! सोमालियातून सतर्कतेचा संदेश, सुरक्षेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 5:41 AM

मुंबईत पुन्हा २६/११ करू, असा धमकी संदेश ताजा असतानाच मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शुक्रवारी आणखी एक सतर्कतेचा संदेश येऊन थडकला.

मुंबई :

मुंबईत पुन्हा २६/११ करू, असा धमकी संदेश ताजा असतानाच मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शुक्रवारी आणखी एक सतर्कतेचा संदेश येऊन थडकला. सोमालियातील घटनांच्या अनुषंगाने भारतात योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना या संदेशात करण्यात आल्या आहेत. संदेशात कोणत्याही प्रकारची धमकी नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला. इंग्रजीत लिहिण्यात आलेल्या या संदेशात कोणत्याही प्रकारची धमकी देण्यात आलेली नाही. सोमालियातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला असून त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईवर दहशतवादी हल्ला करू, अशी धमकी देणारा संदेश वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आला होता. त्याची गंभीर दखल घेत सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गणेशोत्सव नजीक आल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोणतीही अनुचित घटना घड्डू नये यासाठी मुंबई पोलिसांनी संरक्षणात्मक उपाय म्हणून मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरील गस्त आणि सुरक्षा वाढविली आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीस