नायजेरियन नागरिकासह दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियन नागरिकासह दोघांना अटक करून २५० ग्रॅम मेफेड्राॅन (एमडी) जप्त केले. बाजारात त्याची किंमत ३७ लाख ५० हजार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी फ्रान्सिस अगस्तीन डिसोझा (२९,रा. मानखुर्द,), रिचर्ड टोनी (३९,रा. मीरा रोड) यांना घाटकोपर पथकाने अटक केली आहे. दोघे एमडी मुंबई व नवी मुंबई परिसरात विक्री करत होते. त्यांच्याकडून ड्रग्ज तस्करीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज तस्करी व विक्री विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. घाटकोपर पथकाच्या प्रभारी लता सुतार यांना माहिती मिळाली की एक तरुण शुक्रवारी सायंकाळी सायन-पनवेल मार्गावरील वाशीच्या दिशेने जाणाऱ्या आगरवाडी बेस्ट बस स्टॉप रूट क्रमांक ५०४ येथे ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे. त्यांनी उपनिरीक्षक निलेश भालेराव व अन्य पथकासह परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. झडतीत त्याच्याकडे ४५ ग्रॅम एमडी मिळाले. चौकशीत त्याचे नाव फ्रान्सिस डिसोझा असून त्याने जुईनगर रेल्वे स्थानकाबाहेर बस स्टॉपवर एक नायजेरियन आणखी ड्रग्ज घेऊन येणार असल्याचे समजले. त्यानुसार त्याच रात्री तेथून रिचर्ड टोनीला पकडले. झडतीत त्याच्याकडे २०५ ग्रॅम एमडी मिळाले. या दोघांविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये ८(क) सह२२(क)२९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.