मुंबई : कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार दाखल केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी याबद्दल २४ तासांत माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी बुधवारी दुपारी मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आले. कायदेशीर नोटीस दिल्यावर जाऊ दिले गेले. त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी करत मला अडविले. त्यामुळे याप्रकरणी अधिकृत तक्रार करण्यासाठी मी पोलिस ठाण्यात आलो आहे, असे सोमय्या यांनी यावेळी सांगितले. २४ तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी अशी आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले.
सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी २० सप्टेंबरला कोल्हापूरला जाण्याची घोषणाही केली होती. मात्र, पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी केली. पोलिसांनी अडवणूक केल्याचा आरोप करतानाच उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशाप्रकारे लोकशाही चालवणार आहेत का, असा सवालही सोमय्या यांनी यावेळी त्यांनी केला.
२८ सप्टेंबरला कोल्हापूर दौरा
सोमय्या यांनी २८ सप्टेंबरला कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणाही केली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना आज पत्र लिहिले आहे. २० तारखेचा स्थगित झालेल्या दौऱ्यासाठी २७ सप्टेंबरला मुंबईहून निघून २८ तारखेला मंगळवारी कोल्हापुरात असेन. सकाळी ९ वाजता अंबाबाई महालक्ष्मी मातेचे मंदिर दर्शन करायची इच्छा आहे. तसेच, कागल येथे भ्रष्टाचार प्रकरणी तक्रार दाखल करून पुरावे सादर करायचे आहेत, असे सोमय्या यांनी पत्रात नमूद केले आहे.