मुंबई : मुंबई पोलिसांनी तराफा पी-३०५ प्रकरणात काही कंपन्यांना समन्स बजावले आहेत, तर या प्रकरणात तराफामधून वाचलेल्या १० जणांचे जबाब नोंदवून यलो गेट पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७१ मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. यापैकी ५६ मृतदेहांची ओळख पटली असून, त्यापैकी ५२ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत, तर उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यात समुद्रात पाण्यात राहिल्यामुळे काही मृतदेह कुजले आहेत. अशात त्यांची डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटविण्यात येणार आहे, तर दुसरीकडे या प्रकरणात आतापर्यंत १० जणांचे जबाब नोंदविले आहेत. या प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कॅप्टन राकेश बल्लवविरुद्ध गुन्हा दाखल आहे, तर काही कंपन्यांना समन्स बजावून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.