Join us

‘ब्रेक दि चेन’साठी पालिकेसोबत मुंबई पोलिसांचे ‘टायअप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:05 AM

कार, रिक्षांसह सर्व वाहनांची होणार तपासणी; जमावबंदीदरम्यान विनाकारण न फिरण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला ...

कार, रिक्षांसह सर्व वाहनांची होणार तपासणी; जमावबंदीदरम्यान विनाकारण न फिरण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ नावाने नवी नियमावली जारी केली आहे. ५ एप्रिल, २०२१ पासून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत. या मिशनला यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

मुंबईत सर्व पोलीस ठाण्यात सरकारचे बारा पानी पत्रक पोहोचले आहे. त्यानुसार मोहल्ला कमिटी, स्थानिक संस्था, कार्यकर्ते व समाजसेवक, हॉटेल व रेस्टॉरंट तसेच व्यापारी संघटनांसोबत बैठका घेऊन त्यांच्यातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करून त्यांच्यावर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर पोलिसांनी मेगा फोनवरून याबाबत उद्घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. मोहल्ला कमिटी व अन्य व्हॉट्सॲप ग्रुपवरही याबाबत मेसेजेस पाठवत अफवांना बळी न पडण्याची विनंती करण्यात आली आहे.

नियम मोडणाऱ्यांना दंड आकारताना तसेच अन्य कारवाई करताना आम्ही पालिकेची मदत घेणार असून त्यांना काही मदत लागल्यास ती तातडीने पुरविण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कार तसेच रिक्षामध्ये सरकारने परवानगी दिलेल्या प्रवाशांच्या संख्येव्यतिरिक्त अधिक संख्या असल्यास त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. जमावबंदीदरम्यान एखादी व्यक्ती जरी बाहेर फिरताना दिसली तरी त्यांना त्याचे ठोस कारण द्यावे लागेल, ज्याची पोलिसांकडून शहानिशा करण्यात येईल. कोरोनाविरोधातील या लढाईत नागरिकांनीही योग्य सहकार्य करत सहभाग घेतला तर आपण काेराेनाला नक्कीच पळवून लावू, अशी आशा मुंबई पोलिसांनी व्यक्त केली.

..............................