Join us  

मुंबई पोलीस टॉप ट्रेंड्समध्ये

By admin | Published: January 27, 2016 7:00 PM

खरंतर, ब-यापैकी उशीरा मुंबई पोलीस ट्विटरवर आले, परंतु नर्मविनोदी शैलीतील त्यांच्या टि्वट्समुळे त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मुंबई पोलीसांचं ट्विटर हँडल आज बुधवारी टॉप टेन ट्रेंडिंगमध्ये आलं आहे. खरंतर, ब-यापैकी उशीरा मुंबई पोलीस ट्विटरवर आले, परंतु नर्मविनोदी शैलीतील त्यांच्या टि्वट्समुळे त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. मुंबई पोलीस विविध दक्षता अभियान राबवतात आणि आकर्षक ट्विटसच्या माध्यमातून ती फॉलोअर्सपर्यंत पोचवतात. यामध्ये कल्पक भाषेचा वापर केल्यामुळे ती ट्रेंड होत आहेत.
If you roll, we will weed you out हे मुंबई पोलीस कमिशनरच्या ट्विटर हँडलवरचं ट्विट एक हजार पेक्षा जास्त वेळा रीट्विट झालं. सोशल मीडियावरचे फॉलोअर्सही या ट्विट्सना दाद देताना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
मुंबई पोलीस कमिशनरांच्या ट्विटर हँडलला २२ हजार जणांनी फॉलो केलं आहे, तर मुंबई पोलीसांच्या ट्विटर हँडलला ३० हजार पेक्षा जास्त जण फोलो करत आहेत. 
रोमियोगिरी करणा-यांना समज देताना एक ट्विट सांगतं, तिच्या फोटोवर भलतीसलती कमेंट केलीत, तर आमच्याबरोबर तुम्हाला दीर्घकाळाची डेट मिळेल. किंवा, जर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना दिलीत तर तुम्ही समस्यांच्या जाळ्यात अडकालसारख्या कल्पक ट्विट्स या हँडल्सवरून करण्यात येत आहेत.
वाहतूक सुरक्षा अभियानाच्यावेळी Helmet or Hell-met असं कल्पक ट्विट करण्यात आलं होतं.
पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी ट्विटर अकाउंटसाठी मीडिया एजन्सी नेमल्याचं सांगितलं. अर्थात, पोलीसांनी संमती दिल्यानंतरच ट्विटरवर कमेंट टाकली जाते, असं ते म्हणाले.