मुंबई-
बनावट कागदपत्रांच्या आधारे विकासकाची घरे स्वस्तात विकून ६५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वेश व्होरा असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्यानं आपला मोबाइल फोन बंद ठेवला होता. तसंच तो सतत घरं बदलायचा. एक दिवस पोलिसांना पूर्वेश विरार परिसरात असल्याची टीप मिळाली आणि पोलिसांनी फिल्डिंग लावली. डिलिव्हरी बॉय बनून पोलीस पूर्वेशच्या घरी गेले. फसवणुकीच्या गुन्ह्यात पूर्वेश याला न्यायालयीन कोठढी सुनावली आहे.
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्याच्याकडे पूर्वेश आधी कामाला होता. नवीन घर पाहण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तो घराचा दर कमी सांगायचा. त्यानंतर बनावट कागदपत्र तयार करुन ती घरं त्यांना स्वस्तात द्यायचा. फेब्रुवारी महिन्यात फसवणुकीचा प्रकार विकासकाच्या लक्षात आला. ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासकाने साकीनाका पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी पूर्वेशविरोधात गुन्हा नोंदवला. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक वाल्मीक कोरे, भुवड, खैरमोडे, बंगाळे इत्यादींच्या पथकानं तपास केला.
पोलिसांनी पकडू नये म्हणून पर्वेशनं मोबाइल बंद करुन ठेवला होता. तसंच तो सतत घर बदलत राहायचा. कोणालाही आपली माहिती मिळणार नाही याची काळजी त्यानं घेतली होती. पूर्वेश सध्या विरारमध्ये राहत असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि त्यांनी फिल्डिंग लावली. पोलीस डिलिव्हरी बॉय बनले. खाद्य पदार्थांची ऑर्डर घेऊन पोलीस पूर्वेशच्या घरी गेले. तेथून त्याला अटक केली. फसवणुकीचे पैसे त्याने कोणाला दिले याचा तपास पोलीस करत आहेत.