मुंबई'थर्टी फर्स्ट' म्हटलं की दणक्यात पार्टी झालीच पाहिजे ना भाऊ! असा तरुणाईचा ओढा असतो. प्रत्येक जण दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी करतो. पण यावेळी कोरोनामुळे सर्वच बाबतीत अनेक निर्बंध आलेत.
कोरोनामुळे यावेळी रात्री ११ नंतर महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असलं तरी टवाळखोरांना नियम मोडण्याची हुक्की भरते. पण अशांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस देखील सज्ज असतात. त्यात मुंबई पोलिसांची तर बातच न्यारी आहे. मुंबई पोलीस जसे त्यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीसाठी जगात ओळखले जातात. तसंच मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडलही तुफान चर्चेत असतं. नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'जरा हटके' आणि कल्पक पद्धतीनं मुंबई पोलीस ट्विटरवरुन नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असतात.
मुंबई मनपा क्षेत्रात रात्री ११ नंतरच्या संचारबंदीच्या नियमाबाबत एका नेटिझनने विचारलेल्या प्रश्नावर मुंबई पोलिसांनी दिलेलं भन्नाट उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
एका ट्विटरकरांनं मुंबई पोलिसांना प्रश्न केला की, "जर मी तिच्या घरी ११ वाजता पोहोचलो आणि रात्रभर तिथंच राहिलो तर?" यावर पोलिसांनी त्याला जबरदस्त उत्तर दिलं. "तू तिची परवानगी घेतली असशील अशी आशा आहे. नाहीतर तुझ्या रात्रीच्या मुक्कामासाठी आमच्या विचारात एक उत्तम जागा आहे. #ConsentMatters", अशा गमतीशीर पद्धतीनं पोलिसांनी त्या नेटिझनला समज दिली आहे.
यंदा 'थर्टी फर्स्ट' घरीच करण्याचं आवाहनकोरोनामुळे मुंबईकरांनी यंदा 'थर्टी फर्स्ट' घरच्या घरी सेलिब्रेट करावा, यासाठी मुंबई पोलिसांनी अतिशय कल्पकतेने ट्विटरच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मग ते 'हम साथ, साथ है' चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून असो किंवा मग एखाद्या चारोळीतून. मुंबई पोलिसांच्या या अनोख्या मोहीमेची ट्विटवर जोरदार चर्चा आहे.