Lalbaugcha Raja: कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे कडक पोलीस सुरक्षेमुळे लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांमधला तिढा अखेर सुटला आहे. मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करुन निर्बंधांवरुन असलेल्या नाराजीवर सुवर्णमध्य काढला आहे. त्यामुळे 'लालबागच्या राजा'च्या प्राणप्रतिष्ठेस आता १५ मिनिटांत सुरुवात होणार असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी दिली आहे.
'लालबागचा राजा'च्या प्राणप्रतिष्ठेस विलंब, पोलिसांच्या कडक सुरक्षेनं स्थानिक त्रस्त
मुंबईसह संपूर्ण राज्यात आज लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. यंदाही कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पण कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे लालबाग परिसरात मोठा फटका स्थानिकांना बसत असल्याचं दिसून आलं. 'लालबागचा राजा'च्या श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होऊ शकते त्यामुळे पोलिसांनी परिसरातील दुकानं बंद ठेवली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. याशिवाय परिसरातील अनेक रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असल्यानं स्थानिकांना आपल्या घरी जाण्यासही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं वाद निर्माण झाला होता. स्थानिकांच्या मागण्यांवर लालबागचा राजा मंडळ देखील ठाम होतं आणि राजाच्या प्राणप्रतिष्ठेस विलंब होत होता.
विश्वास नांगरे पाटलांनी काढला सुवर्णमध्य!लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठेस निर्बंधांमुळे विलंब होत असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे थेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले. मंडळाच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर नांगरे पाटील यांनी स्थानिक दुकानदारांसाठी तात्काळ एक नियम जाहीर केला.
"लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी देशाविदेशातून भक्त इथं येत असतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शहरात कलम १४४ लागू केलं आहे. त्यात इथली जवळपास १०० दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. कारण दुकानं सुरू ठेवली की गिऱ्हाईक इथं जमणार आणि ते दर्शनासाठी गर्दी करणार. त्यामुळे दुकानं बंद ठेवली होती. पण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून आता येथील १०० दुकानांच्या मालकांना प्रत्येकी दोन पास देण्यात येणार आहेत. यात दुकानाचा मालक आणि एक कर्मचारी अशा फक्त दोघांनाच दुकानात उपस्थित राहता येणार आहे. नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं तर पुन्हा पूर्वीप्रमाणेच दुकानं बंद केली जातील", असं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.
आरतीवेळी केवळ १० जणांना उपस्थित राहता येणारलालबागचा राजाच्या आरतीवेळीही स्थानिक गर्दी करण्याची शक्यता असल्यानं मंडळाला केवळ १० जणांच्या उपस्थितीतच आरती करावी, अशी सवलत आम्ही दिली आहे, असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले. सेलिब्रिटिंना दर्शनाची परवानगी देणार का याबाबत विचारलं असता आरतीला कोण उपस्थित राहतं याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही. फक्त १० माणसांपेक्षा अधिक माणसं आरतीवेळी उपस्थित नसावीत असं आम्ही मंडळाला सांगितलं आहे आणि मंडळाच्या स्वयंसेवकांनीही सहकार्य करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं आहे, असं नांगरे पाटील म्हणाले.