Join us  

विवाहित व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी घरातून पळाली तरुणी; कोर्टाने दिलं २४ तास पोलिसांचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 2:18 PM

Mumbai : गुजरातमधून पळून आलेल्या महिलेला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Bombay High Court:आंतरधर्मीय विवाहित जोडप्याला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश मुंबई हाटकोर्टाने शुक्रवारी मुंबई पोलिसांना दिले. गुजरात पोलीस महिलेला घेऊन जातील, अशी भीती जोडप्याला वाटत होती. जोडप्यासोबत वैयक्तिकरित्या बोलल्यानंतर कोर्टाने पोलीस संरक्षण देण्याचा आदेश दिला. आधीच विवाहित आणि तीन मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीसोबत आपण स्वत:च्या इच्छेने लग्न केले असल्याचे महिलेने कोर्टात सांगितले.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या दाम्पत्याने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांसोबत २४ तास, आठवड्याचे सातही दिवस दोन सशस्त्र रक्षक देण्यात यावेत, जे ८ ऑगस्टपर्यंत याचिकाकर्त्यांसोबत राहतील. ते कुठेही गेले तरी हरकत नाही, असे न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. याचिकाकर्त्यांवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेशही खंडपीठाने अहमदाबादच्या नारोल पोलिसांना दिले.

नेमकं प्रकरण काय?

याचिकाकर्ता पुरुष हा मुंबईचा रहिवासी आहे. तर महिलेने मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न करण्यासाठी अहमदाबादमधील तिचे घर सोडून मुंबई गाठली होती. मात्र याचिकाकर्ती महिला घरातून  गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता तक्रार दाखल केली. त्यानंतर तिच्या भावाने महिलेविरुद्ध  ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख घेऊन पळ काढल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यामुळे गुजरात पोलिसांकडून संरक्षण मिळावे यासाठी दाम्पत्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. वकील एमएल कोचरेकर आणि मोहम्मद अहमद शेख यांनी या दाम्पत्याची बाजू मांडली. या जोडप्याने संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. गुजरात पोलिसांसह २४ वर्षीय महिलेचे आई-वडील आणि भाऊही न्यायालयात हजर होते.

१५ जुलै रोजी घरातून पळून गेल्यावर आपण काहीही चोरले नसल्याचे महिलेने खंडपीठाला सांगितले. मी घातलेली सोन्याची चेन आणि कानातले आई-वडिलांना देण्यासही मी तयार आहे. मात्र, काही दिवसही आपण आई-वडिलांच्या घरी जाणार नाही आणि त्यांना भेटणारही नाही, असेही महिलेने सांगितले.

याचिकाकर्ती महिला गेल्या सहा वर्षांपासून त्या पुरुषाला ओळखत होती. तो व्यक्ती महिलेच्या मामाबरोबर एका फर्ममध्ये भागीदार होता. तो विवाहित आहे आणि त्याला तीन मुले आहेत हे महिलेला माहिती होती. असे असतानाही तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोर्टाने सर्व  पक्षांशी वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे संवाद साधला. याचिकाकर्ती आणि त्याचे पालक यांच्यात वैर असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खंडपीठाने मुंबई पोलिसांना तात्काळ या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, यावेळी अहमदाबादच्या नारोल पोलिसांना कोर्टाला सांगितले की, आम्ही या जोडप्याचा फक्त जबाब नोंदवण्यासाठीच मुंबईत आलो होतो. त्यांना गुजरातला परत नेण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यानंतर खंडपीठाने ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा मुंबईतील व्हीबी नगर पोलिस ठाण्याला माहिती देऊन जोडप्याचा जबाब नोंदवू शकतात, असं सांगितले. 

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालयमुंबई पोलीस