ड्रग्जविरोधात मुंबई पोलिसांची मोहीम; कारवाईला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:13 AM2020-10-08T02:13:33+5:302020-10-08T02:13:38+5:30
लाखोंच्या एमडीसह ब्राऊन शुगर जप्त
मुंबई : ड्रग्जविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गोवंडी, वांद्रेपाठोपाठ मंगळवारी अंधेरीत केलेल्या कारवाईत सुमारे दोन लाखांच्या एमडीसह २० हजार रुपयांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली.
अंधेरी परिसरात एक जण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून अब्बास मोईन शेख (२९) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत २ लाख २० हजार रुपयांच्या एमडीसह २० हजार रुपयांची ब्राऊन शुगर सापडली. तो वांद्रे येथील महाराष्ट्र नगर परिसरात राहण्यास आहे. डी.एन. नगर पोलिसांनी ही कारवाई केली असून अधिक तपास सुरू आहे.
यापूर्वी हैदराबाद येथील मोहम्मद ताज शेख या तरुणाकड़ून ४२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे पथकाने ही कारवाई केली. तर गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने गोवंडीतून २ आॅक्टोबर रोजी एका महिलेला अटक केलीे. तिच्याकड़ून १० लाख ९० किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले.
३० कोटींचा दंड वसूल
मुंबई : राज्यात २२ मार्च ते ६ आॅक्टोबरपर्यंत संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख ७७ हजार ८३७ गुन्हे नोंद झाले. त्यामध्ये ४० हजार व्यक्तींना अटक झाली. विविध गुन्ह्यांसाठी एकूण ३० कोटी ३ लाख ५३ हजार ८८२ रुपये दंड आकारण्यात आला.