मुंबई : सायबर गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी मुंबईपोलिसांचे सायबर कमांडो सज्ज होत आहे. दुसरीकडे, १९३० या हेल्पलाइनमुळे दिवसाला ६० ते ७० लाख वाचविण्यात यश येत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयातील भरूचा हॉलमध्ये बुधवारी सायबर शिल्डचा अनावरण सोहळा पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईचे मुख्य व्यवस्थापक जी. एस. राणा यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी १३ झोनमधील प्रत्येक सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले २०० अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक पोलिस ठाण्यातील सायबर अधिकारी व अंमलदार हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना ‘सायबर कमांडो’ म्हणून घोषित करून त्यांचा गौरव केला.
मुंबईतील १३ परिमंडळातील सायबर कक्ष अधिक सुसज्ज करण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले. यावेळी, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मार्गदर्शन करताना, येणारा काळ हा डिजिटल काळ असणार आहे. त्यामुळे पोलिस दलात येणाऱ्या प्रत्येकाला सायबर प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार आहोत.
सायबर गुन्ह्यांमुळे आर्थिक, सामाजिक नुकसान होत आहे. एका चुकीमुळे पैसे जात आहे. मात्र नागरिकांनी न घाबरता तत्काळ १९३० या हेल्पलाइनवर कॉल केल्यास पैसे परत मिळू शकतात. आतापर्यंत २५ कोटी वाचविण्यात यश आले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे जात आहे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. सायबर गुन्हे उघडकीस आणणे व प्रतिबंध करणे यासाठी मुंबई पोलिस हे कसोशीने प्रयत्न करीत असून, त्यांना आणखी प्रशिक्षण देऊन अधिक कार्यक्षम बनविण्यात येणार असल्याचे सूतोवाचही केले.
सायबर शिल्डचे अनावरण करताना पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्य नारायण चौधरी, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईचे मुख्य व्यवस्थापक जी. एस. राणा.
दिवसाला वाचताहेत ६० ते ७० लाख :
देवेन भारती यांनी सांगितले, मागील वर्षात सायबर अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यतत्परतेमुळे सायबर गुन्हयांस बळी पडून ज्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
फसवणूक टाळण्यासाठी १९३० ला संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. सायबर गुन्हयांची वाढणारी तीव्रता व क्लिष्टता लक्षात घेवुन सायबर अधिकारी व अंमलदार यांनी स्वतःला सतत प्रशिक्षित करत राहिले पाहिजे असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
जनजागृतीवर भर :
सायबर गुन्हयांबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या इंग्लिश व मराठी भाषेतील पोस्टरचे सुध्दा अनावरण करण्यात आले. हे पोस्टर ठिकठिकाणी लावून जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.