वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचे ‘ग्रीन कॉरिडॉर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:06 AM2021-04-20T04:06:40+5:302021-04-20T04:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कलर कोडिंग सिस्टीम लागू करण्यात आली. साेबतच कोरोनाच्या काळात ...

Mumbai Police's 'Green Corridor' for Medical Staff | वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचे ‘ग्रीन कॉरिडॉर’

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचे ‘ग्रीन कॉरिडॉर’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कलर कोडिंग सिस्टीम लागू करण्यात आली. साेबतच कोरोनाच्या काळात रुग्णापर्यंत वैद्यकीय सेवा लवकरात लवकरात पोहचावी यासाठी मुंबई पोलिसांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला आहे. त्यानुसार, साेमवारी मुंबई पोलीस विविध तपासणी नाक्यांंसह टोल नाक्यांवर वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लाल रंगाचा स्टिकर लावलेल्या वाहनांना त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र मार्गिकेतून पाठविताना दिसले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यभरात संचारबंदी लागू आहे. वाहन तपासणीदरम्यान होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी रविवारपासून अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी कलर कोडिंग सिस्टीम लागू केली आहे. त्यानुसार, वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी लाल रंगाचे, भाजीपाल्याच्या वाहनांसाठी हिरव्या तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचे स्टिकर वाहनांवर लावणे बंधनकारक आहे.

सोबतच या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली आहे. अनेकदा कोंडीमुळे रुग्णवाहिकाही अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र या ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरळीतपणे होण्यास मदत हाेईल.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे महत्त्व आम्हाला माहिती असून, त्यांच्यासाठीच ही मार्गिका तयार करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.

* २८६ वाहनांवर कारवाई

विनाकारण घराबाहेर पडलेल्या २८६ वाहनांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

* तो संदेश खोटा!

मुंबईत कलर कोडिंग सिस्टीम लागू करण्यात आल्यानंतर मुंबईच्या पेट्रोलपंपावर केवळ असे स्टिकर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळणार असल्याचे आदेशही मुंबई पोलिसांनी काढल्याचा संदेश व्हायरल झाला. मात्र, मुंबई पोलीस आयुक्तांनी तो संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले.

* पोलिसांनी लावले स्टिकर

मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांनी ज्या वाहनांवर स्टिकर नाहीत त्यांना स्टिकर लावून दिले. कोणीही स्टिकरचा गैरवापर करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

.....................................

Web Title: Mumbai Police's 'Green Corridor' for Medical Staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.