Join us

प्रदूषणाने ‘मुंबईकर’ गुदमरतोय...! पालिकेची यंत्रणा ठरतेय कूचकामी? तक्रारी करूनही दुर्लक्ष; नागरिकांचा संताप

By सीमा महांगडे | Published: May 12, 2023 11:03 AM

कोरोनानंतर सुरू झालेली बांधकामे तसेच विविध विकासकामांमधून निर्माण होणारी धूळ, त्याच्या सोबतीला हवेच्या स्थितीत झालेले बदल या प्रमुख घटकांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली आहे.

सीमा महांगडे

मुंबई : कोरोनानंतर सुरू झालेली बांधकामे तसेच विविध विकासकामांमधून निर्माण होणारी धूळ, त्याच्या सोबतीला हवेच्या स्थितीत झालेले बदल या प्रमुख घटकांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली आहे. यामुळे मुंबईकर श्वसन विकारांना बळी पडल्याची माहिती समोर येत आहे. पालिका क्षेत्रात सद्य:स्थितीत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक ठिकाणी विविध कामे सुरू असून, तेथून निर्माण होणाऱ्या धुळीला अटकाव करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

वारंवार तक्रारी करूनही पालिकेची यंत्रणा ही कागदोपत्री टास्क फोर्स आणि समित्या तयार करण्याचा फार्स करत असल्याची टीका प्रशासनावर होत आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास झोपडपट्ट्यांमध्ये प्रदूषणाची पातळी सर्वाधिक असून, यामुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. गोवंडी, अंधेरी भागात प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

मुंबईत वाढत्या लोकसंख्येसह सतत नव्याने सुरू असलेली बांधकामे, वाहनांतून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक प्रदूषण वाढले आहे. याच कारणास्तव २०१६ ते २०२१ या कालावधीत, मुंबईतील एकूण १४ हजार ३९४ रुग्णांचा सीओपीडीमुळे मृत्यू झाला आहे. हानिकारक प्रदूषकांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे हा आजार होतो. सीओपीडीमुळे दरवर्षी २,३९९ मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.

गोवंडीसारखा प्रभाग हा प्रदूषणाचे केंद्र असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन काहीच कार्यवाही करत नाही. आताही वॉर्डनिहाय स्थापन केलेल्या प्रदूषण यंत्रणेकडून आवश्यक ती कारवाई होत नसल्याचे समोर येत आहे. प्रदूषण पातळी इतकी जास्त असल्याची माहिती यंत्रणेकडे असतानाही त्या संबंधित प्रभागात पालिकेकडून आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येत नाहीत.     - शेख फैय्याज आलम,    अध्यक्ष, गोवंडी सिटिझन्स फोरम

पालिकेची यंत्रणा कुठे आहे? 

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर सुधारावा म्हणून विभागीय पातळीवर प्रमाणित कार्यपद्धती अंमलात आणण्यास सुरुवात झाली आहे. धुळीच्या नियंत्रणासाठी महापालिका क्षेत्रात तातडीने व सक्त उपाययोजना अंमलात आणण्याचे तसेच या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बांधकाम रोखण्यासह इतर कठोर कारवाईचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, अद्याप त्याची प्रत्यक्ष कारवाई कुठे होत आहे याच्या तपशिलाची कुठेच नोंद नसल्याची तक्रार स्थानिक करत आहेत.

बांधकामाच्या ठिकाणी हवेत उडणाऱ्या धुलिकणांच्या नियंत्रणासाठी टास्कफोर्स काम करणार रस्त्यांची झाडलोट आणि स्वच्छता करणार

रस्त्यांवर धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजना आणि पाण्याची फवारणी करणे, रस्ते स्वच्छतेच्या विशेष मोहिमा यावर देखरेख ठेवणार

मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, बेकरी, उपाहारगृहे, रस्त्यांवरील स्टॉलसारख्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे इंधन वापरात येते, याची देखरेख करणे