मुंबई बंदराने गाठला मालवाहतुकीचा उच्चांक; ६७.२५ मिलियन टन मालाची वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:25 AM2024-04-04T10:25:34+5:302024-04-04T10:26:47+5:30
मुंबई बंदराने यंदा मालवाहतुकीचे नवे उच्चांक गाठले आहेत.
मुंबई : मुंबई बंदराने यंदा मालवाहतुकीचे नवे उच्चांक गाठले आहेत. मुंबई बंदरात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक सरत्या आर्थिक वर्षात नोंदवली गेली असून, २०२३-२४ या वर्षात मुंबई बंदरातून ६७.२५ मिलियन टन मालाची वाहतूक झाली आहे.
मुंबईतून अवजड उद्योगधंदे बाहेर गेल्याने मुंबई बंदरातील मालवाहतूक घटली होती. तसेच न्हावाशेवा येथील जेएनपीटी बंदराकडेही मालवाहतूक वळली होती. खासगी बंदरांबरोबर मुंबई पोर्ट ऑथोरिटीच्या (एमबीपीए) बंदराला स्पर्धा करावी लागत आहे. त्यातून मुंबई बंदराच्या व्यवसायात मोठी घट झाली होती.
मालवाहतूक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. याचा फायदा झाला असून आता पुन्हा एकदा मुंबई बंदरातून मालवाहतूक वाढू लागली आहे. मुंबई बंदरात २०२२-२०२३ या वर्षात ६३.६१ मिलियन टन मालाची वाहतूक झाली होती. त्यामध्ये ६.१४ टक्क्यांची वाढ झाली. सरत्या वर्षात बंदरातून ६७.२५ मिलियन टन मालाची वाहतूक झाली आहे. मुंबई बंदरात मालवाहतुकीमध्ये सर्वाधिक योगदान पेट्रोलियम पदार्थांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
...यामुळे मालवाहतूक वाढली
१) एमबीपीएकडून मालवाहतूक वाढविण्यासाठी मागील काही काळापासून प्रयत्न केले जात होते. त्याचाच भाग म्हणून जहाज बंदरात दाखल झाल्यानंतर कमीत कमी वेळात त्यातून माल खाली होईल यासाठी प्रयत्न करण्यात आले.
२) तसेच मालवाहतूकदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये माल साठवणुकीसाठी जागा, हाताळणी दरांमध्ये सवलत आदींचा समावेश आहे. यातून मालवाहतूक वाढली, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
३) जवाहर द्वीप बंदरातून क्रूड ऑइल आणि पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ६.७३ टक्क्यांनी वाढली आहे.
४) तर पिर पऊ बंदरातून या पदार्थांची मालवाहतूक ११.१८ टक्क्यांनी वाढली आहे. तर इंदिरा डॉक आणि ओसीटी येथे लोह आणि स्टील उत्पादनांची मालवाहतूक ३६.५५ टक्क्यांनी वाढली आहे, अशी एमबीपीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.