मुंबई : केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय सागरी योजनेत (गतिशक्ती) मुंबई पोर्ट ट्रस्टचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. व्यापार आणि पर्यटनाला प्रोत्साहन देत मुंबई बंदराचा कायापालट करण्याचा उद्देश त्यामागे आहे. या योजनेत मुंबईत बंदरातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश असून, त्या अंतर्गत मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीद्वारे लॉजिस्टिक्स क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने अनेक योजना आखल्या आहेत. त्यात कार्गो आणि सागरी पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांचा अंतर्भाव आहे. त्यानुसार ‘’पीओएल’’ क्षमता वाढविण्यासाठी २२ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेची सर्वात मोठी कच्च्या तेलाची जेटी मरीन ऑइल टर्मिनल येथे बांधण्यात आली आहे. त्याशिवाय बंकरिंग टर्मिनल उभारण्याची योजना असून, मुंबई बंदराला दरवर्षी भेट देणारी ५ हजारांहून अधिक जहाजे येथून इंधन भरून मार्गस्थ होऊ शकतील.द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) हस्तांतरण प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीवरील सुविधांवर भार न टाकता वार्षिक ५ दशलक्ष टनांपर्यंत स्वच्छ ऊर्जा म्हणून एलएनजी प्रदान करता येईल. फ्लोटिंग टर्मिनल समुद्रात असेल आणि एलएनजी पुरवठा पाइपलाइनद्वारे नॅशनल ग्रीडशी जोडला जाईल. जेएनपीटी आणि मुंबईदरम्यान कंटेनर बारजिंग प्रकल्पामुळे जेएनपीटीवरून जलमार्ग जोडणीद्वारे केवळ १४ किमी अंतर पार करून अधिक कंटेनर येतील. यामुळे १२० किलोमीटरचा रस्तेमार्गे लांबचा प्रवास टाळता येईल. तसेच प्रदूषण आणि वाहतूक कोंडी दूर होईल. खासगी कंपन्यांकडून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर सिमेंट फ्लाय ॲशच्या साठ्यासाठी तात्पुरते कोठार उभारण्याकरिता स्वारस्य निविदा मागविण्यात आल्या आहेत. जगातील सर्वांत लांब समुद्री रोपवेजवळपास ५०० रुपयांहून अधिक निधी खर्च करून मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचा विकास केला जात आहे. शिवाय प्रिन्स आणि व्हिक्टोरिया गोदीदरम्यान मुंबई पोर्ट वॉटरफ्रंट सुविधा उभारल्या जात आहेत. त्यात रो-पॅक्स टर्मिनलसह समुद्राला लागून रेस्टॉरंट्स, ॲम्फीथिएटर, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल, मरीना, फ्लोटिंग रेस्टॉरंट्स, हार्बर क्रूज, वॉटर टॅक्सीचा समावेश आहे. शिवडी ते एलिफंटा गुंफादरम्यान समुद्रावर जगातील सर्वात लांब ८ किमीचा रोपवे बांधण्यात येत असून, त्यासाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सागरी किनारा, मरीन ऑइल टर्मिनल, प्रस्तावित शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर मार्गासह फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यांचे विहंगम दृश्य त्यातून पाहायला मिळेल.
मुंबई बंदरातील प्रकल्पांना मिळणार ‘गती आणि शक्ती’; व्यापार आणि पर्यटनवृद्धीचे उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 8:11 AM