मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टने आपले एक लाख कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष कोविड हॉस्पिटल उभारले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी प्रत्यक्ष वॉर्डात जाऊन रुग्णांना धीर दिला. मुंबई पोर्ट ट्रस्टने आपले १०० बेडचे हॉस्पिटल हे १२० बेडचे कोविड हॉस्पिटल आणि २५ बेडचे नॉन कोविड हॉस्पिटल म्हणून रूपांतरित केले आहे.
कोविड हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ३३३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर ३७ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी करण्यात आलेली तयारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वत: संजय भाटिया हे कोविड वॉर्डात डॉक्टरांच्या टीमसह पीपीइ किट घालून पोहोचले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. ‘माझे कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मी एवढे केलेच पाहिजे,’ अशी भावना भाटिया यांनी व्यक्त केली. जवळपास १०२ रुग्णांवर एका वॉर्डात उपचार सुरू आहेत त्यातील ७२ पॉझिटिव्ह तर ३२ संशयित आहेत.
भाटिया या वॉर्डात पोहोचले तेव्हा सुरक्षारक्षक असलेल्या एका रुग्णाने त्यांना उभे राहून सलाम केला. भाटिया यांनी काही रुग्णांची विचारपूस केली तेथील परिचारिकांशीदेखील त्यांनी संवाद साधला. मात्र या हॉस्पिटलमधील रुग्णांची वाढत असलेली संख्या ही अतिशय चिंतेची बाब आहे. या ठिकाणी आयसीयू, बेड तसेच आॅक्सिजनची सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे, अशी भावना त्यांनी डॉक्टरांनी बोलून दाखवली.
भाटिया यांनी काहींना नोडल अधिकारी म्हणून नेमले आहे. या अधिकाऱ्यांनी आपल्या यंत्रणेच्या मदतीने सेवानिवृत्त कर्मचाºयांना फोनवर संपर्क करायचा टेलिमेडिसीनच्या माध्यमातून त्यांना उपचार द्यायचे. काही लक्षणे दिसत असतील तर लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था करायची ही जबाबदारी सदर अधिकाºयांना देण्यात आली आहे.