पोर्ट ट्रस्टच्या इमारतींमध्ये हजार, तर तरंगत्या जहाजात दोन हजार जणांना क्वॉरेंटाईन करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 07:45 PM2020-04-04T19:45:31+5:302020-04-04T20:14:02+5:30
खलील गिरकर मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे विविध उपाययोजना आखण्यात आल्या अाहेत. कोरोनाचे रुग्ण व संशयितांना ...
खलील गिरकर
मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे विविध उपाययोजना आखण्यात आल्या अाहेत. कोरोनाचे रुग्ण व संशयितांना कॉरन्टाईन सुविधा देण्यासाठी प्रशासनातर्फे तीन इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये एक हजार जणांना कोरन्टाईन करता येईल व त्याशिवाय दोन हजार जणांना कॉरन्टाईन करण्यासाठी समुद्रात जहाज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एकूण तीन हजार जणांना कॉरन्टाईन सुविधा पुरवण्याची तयारी पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने केली आहे.
सध्या इमारतींमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून आवश्यकता भासल्यास समुद्रात जहाजावर कोरोनाच्या रुग्णांना व संशयितांना ठेवण्यासाठी कॉरन्टाईन सुविधा पुरवली जाईल. वडाळा येथील पोर्ट ट्रस्टच्या 100 खाटांच्या या रुग्णालयामध्ये कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 90 टक्के भाग कोरोनाग्रस्त रुग्णाच्या उपचारांसाठी सज्ज करण्यात आला असून उर्वरीत केेवळ 10 टक्के रुग्णालयाचा वापर इतर रुग्णांसाठी करण्यात येत आहे. कोरोना व इतर रुग्ण यांचा संपर्क येऊ नये यासाठी दोन्हीसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार, स्वतंत्र आयसीयु, स्वतंत्र वॉर्ड वापरले जाणार आहे. प्रवेशद्वारावर स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या रुग्णालयामध्ये पीपीई सुट सहित इतर सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे रुग्ण व कोरोनाचेे संशयित यांच्या साठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड व अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण रुग्णालयात मास्क, हातमोजे वापरणे बंधनकारक करण्यात आले अाहे. पुरेशा प्रमाणात पीपीई सुट, मास्क, हातमोजे, औषधे यांची खरेदी करण्यात आली आहे. सात नवीन व्हेंटिलेटर आणण्यात आले आहेत. पोर्ट ट्रस्ट रुग्णालयामधील धन्वंतरी इमारत, नाडकर्णी पार्क वेल्फेअर सेंटर, इंदिरा डॉकमधील सीएमसी इमारत संशयितांना कॉरन्टाईन करण्यात येत आहे. वाडी बंदर येथे सेलर्स होममध्ये 500 जणांसाठी सुविधा पुरवण्याबाबत चर्चा सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी चौवीस तास सुरु राहणारे नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले अाहे. अडीचशे खाटा लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
----------------------------
कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट सज्ज आहे. रुग्ण व संशयितांना कॉरन्टाईन मध्ये ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही इमारती त्यासाठी निश्चित करुन ठेवल्या आहेत. जहाजावर ही सुविधा पुरवण्यासाठी देखील चर्चा सुरु आहे.
- संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट