लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात लवकरच कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात पालिका आणि आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत.
पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लसीकरणासाठी सायन रुग्णालयात पाठविले जाते. त्यासाठी बराच प्रवास करावा लागत असल्याने संभाव्य संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने स्वतःच्या रुग्णालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कामगारांनी केली. यासंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉइज युनियनचे सरचिटणीस तथा मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, ट्रान्सपोर्ट ॲण्ड डॉक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस तथा मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त केरशी पारेख यांनी अध्यक्ष राजीव जलोटा यांची भेट घेतली.
जलोटा यांनी याची तातडीने दखल घेऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी अण्णा दुराई यांना पालिका आणि आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दुराई यांनी संबंधित परवानग्यांसाठी पत्रव्यवहार केला असून, लवकरच वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.