Join us

‘त्या’ परदेशी बोटीबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टला गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे भाऊच्या धक्क्यावर बुडालेली ‘ईपीसी एंजल’ ही परदेशी बोट दीड महिन्यांनतरही पाण्याबाहेर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे भाऊच्या धक्क्यावर बुडालेली ‘ईपीसी एंजल’ ही परदेशी बोट दीड महिन्यांनतरही पाण्याबाहेर काढण्यात न आल्याने इंधन गळती होऊन आसपासचा परिसर प्रदूषित झाला आहे, तसेच बोटीचा मालक कोण, ती धक्क्यावर कोणी उभी केली याचाही शोध सुरू न झाल्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

‘ईपीसी एंजल’ ही पश्चिम आफ्रिकेच्या लायबेरीयातील नोंदणीकृत बोट गेल्या सहा महिन्यांपासून भाऊच्या धक्क्यावर अनधिकृतपणे उभी होती. १७ मे रोजी मुंबईच्या किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळात तिला जलसमाधी मिळाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. मात्र, परदेशी बोटीने विनापरवाना घुसखोरी केल्यानंतर सहा महिने बंदर निरीक्षकांच्या निदर्शनास ही बाब आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरे म्हणजे बोट बुडून दीड महिना लोटला तरी अद्याप ती बाहेर काढण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. शिवाय बोट भाऊच्या धक्क्यावर कशी आली, त्यातून काय आणण्यात आले, परवानगी कोणी दिली आणि तिचा मालक कोण याबाबत तपासही अद्याप सुरू केलेला नाही.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंदरांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. असे असताना एक परदेशी बोट सहा महिने बंदरावर उभी आहे आणि अधिकाऱ्यांना थांगपत्ताच नाही, ही बाब पटण्यासारखी नाही. त्याउपर घटना निदर्शनास आल्यानंतरही तपासकार्यात चालढकल करणे म्हणजे स्वतःचे खिसे गरम करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेचे कार्याध्यक्ष निशांत गायकवाड यांनी व्यक्त केली.

दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी पवन भारती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी भाष्य करण्यास असमर्थता व्यक्त केली.

...........

पोर्ट ट्रस्ट आणि यलो गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम करीत आहेत. दोन्ही यंत्रणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपासाला गती देण्याची गरज आहे. बंदरावर दाखल होणाऱ्या बोटींची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘ईपीसी एंजल’च्या कागदपत्रांची तपासणी केली नव्हती का, तिच्यावर लावलेला लायबेरीचा झेंडा त्यांच्या त्यांच्या निदर्शनास आला नाही का, की नोंदणी न करताच तिला आत सोडण्यात आले, याबाबत स्पष्टीकरण मिळणे गरजेचे आहे.

- निशांत गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना.