Join us

मुंबई एक बंदर होते....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 5:20 AM

दोन वर्षांपूर्वी एका वास्तुरचना महाविद्यालयामध्ये मी एक प्रयोग केला होता. वर्गातल्या प्रत्येकाला एक याप्रमाणे मुंबईमधील महत्त्वाची स्थळे आठवून फळ्यावर लिहायला सांगितली.

- सुलक्षणा महाजनदोन वर्षांपूर्वी एका वास्तुरचना महाविद्यालयामध्ये मी एक प्रयोग केला होता. वर्गातल्या प्रत्येकाला एक याप्रमाणे मुंबईमधील महत्त्वाची स्थळे आठवून फळ्यावर लिहायला सांगितली. मुलांच्या आठवणीतून तयार झालेल्या या यादीमध्ये महत्त्वाच्या आकर्षक इमारती, स्टेशने, चौपाट्या, लोकप्रिय स्थळे, सिनेमागृहे, प्राणी संग्रहालय, उद्याने अशा अनेक जागांचा समावेश होता. त्या साठ-सत्तर स्थळांच्या यादीमध्ये मुंबईमधील दोन महत्त्वाच्या स्थळांचा मात्र समावेश नव्हता. मुंबईचे बंदर आणि मुंबईमधील गिरणगाव ही महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे एकाही विद्यार्थ्याला आठवली नाहीत याचे मला आश्चर्य वाटले. हे विस्मरण असावे की अज्ञान?१९७०च्या दशकात, बोरीबंदर हा मुंबईचा केंद्रबिदू होता. कधी काळी जेथे बोरीची झाडे होती, त्या किनाऱ्यावर ब्रिटिशांनी जहाजांसाठी धक्के बांधले आणि त्याचे बोरीबंदर असे नामकरण झाले. काही वर्षांनी जवळच मुंबईचे भव्य रेल्वेस्थानक बांधले गेले. रेल्वे आणि बंदर या दोन वाहतूक सेवा एकमेकांशी जोडल्या गेल्या. त्यामुळे मुंबईचा व्यापार, कापड उद्योग आणि नावलौकिक वाढला. व्यापारासाठी बांधलेले बोरीबंदरचे धक्के आणि रेल्वे स्टेशन एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात माणसांनी फुलून गेले. ज्या बंदर व्यवसायाने मुंबईला जन्म दिला तो व्यापार आणि त्यासाठी बांधलेले बंदर ओस पडत आहे. हे केवळ मुंबईमध्येच घडले असे नाही, तर लंडन, न्यूयॉर्क, अ‍ॅमस्टरडॅम या सारखी शहरेही व्यापार आणि बंदरे गमावून बसली आहेत. मात्र, त्यांचे जाणीवपूर्वक पुनरुज्जीवन केल्याने तेथील समुद्रकिनारे पर्यटकांच्या वर्दळीमुळे गजबजलेले असतात.मुंबई बेटाचा २८ कि. मी. लांबीचा, निमुळता पूर्व किनारा आणि बंदर कोणालाही सहज दिसत नाही. बंदराला समांतर असणारा पी. डिमेलो रस्ता आणि बंदर यामध्ये उंच, दगडी संरक्षक भिंत असल्यामुळे तेथे कोणाला सहज प्रवेशही मिळत नाही. पश्चिम किनाºयावर असलेल्या मरीन ड्राइव्ह, नेपियन सी रस्ता, हाजीअली, वरळी आणि बांद्रा येथील किनारपट्टी, दादर आणि जुहू चौपाट्या, अशा ठिकाणी नागरिकांना प्रवेश आहे. या उलट पूर्वेकडील समुद्र्रकिनारा नागरिकांपासून फटकून राहिलेला आहे.मुंबईच्या व्यापारी बंदराची मालकी आणि ताबा मुंबई पोर्ट ट्रस्ट ह्या संस्थेकडे आहे. शेकडो एकर जमीन या संस्थेच्या मालकीची आहे. तेथील धक्के, गोदामे, कार्यालये रिकामी आहेत. माजगाव किनाºयावर जहाज बांधणीचा मोठा कारखाना आहे. ससून डॉक, भाऊचा धक्का आणि मासेमारी व्यवसायासाठी असलेला धक्का येथेच नागरिक जाऊ शकतात. उरलेल्या सर्व ठिकाणांची मालकी आणि व्यवस्थापन सार्वजनिक संस्थेकडे असल्याने नागरिकांना तेथे प्रवेश नसतो!जुन्या बंदर विभागातील बहुतेक सर्व व्यापारी उद्योग महानगरापासून दूर गेले आहेत. त्यांनी रिकामे केलेले शहरातील किनारे शहरासाठी, नागरिकांसाठी मुक्त करण्यात आले आहेत. तेथील गोदामे, मोठ्या-मोठ्या इमारती वेगवगेळ्या प्रकारे वापरात आणल्या आहेत. हॉटेल व्यवसाय, नौकानयन, उद्याने, वस्तू आणि मत्स्य संग्रहालये, ऐतिहासिक तसेच जल-व्यापाराची माहिती संग्रहालये, निवासी घरे, लहान उद्योग, कार्यालये अशा अनेक नव्या उद्योगांना तेथे जागा करून दिली आहे. बंदर उद्योगातील रोजगार संपले असले तरी इतर अनेक प्रकारचे, आर्थिक रोजगार नागरिकांसाठी तेथे उपलब्ध झाले आहेत. शहरांचे विभाग आणि उद्योग जुने, जीर्ण होत असतात आणि जाणीवपूर्वक त्यांचा जीर्णोद्धार करावा लागतो. याची जाणीव असल्यामुळे ते घडले आहे. तेथील बंदरे आणि धक्के विस्मृतीमध्ये गेलेले नाहीत तर लोकांच्या, नागरिकांच्या जिवंत आठवणींचा भाग बनले आहेत. मुंबईचे बंदर मात्र अजूनही जीर्णोद्धाराच्या आणि त्यासाठी आवश्यक असणाºया द्रष्ट्या राजकीय नेतृत्वाच्या, इच्छाशक्ती असणाºया मुंबईकरांच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या