आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील बत्ती एकाएकी गुल झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, वीज पुरवठा सुरळीत होण्यास किमान एक तासाचा अवधी लागू शकतो. अशात यावरून सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत.
मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. विद्यापीठ विभागाच्या व आयडॉल परीक्षा १८ तारखेपर्यंत नाहीत. मात्र, महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा क्लस्टर पद्धतीने होत असल्यानं लीड महाविद्यालय आणि त्यातील इतर महाविद्यालयं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः ११ ते १२ या वेळेतील आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.