नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचे दर ४० ते ७० रुपयांवर गेले असून किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. किरकोळ मार्केटमधील दर लवकरच शंभरीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून महागाईमुळे इराणचा कांदाहीबाजार समितीमध्ये विक्रीसाठी आला आहे.
उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला व नवीन पीक येण्यास विलंब लागणार असल्यामुळे देशात सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ७०५ टन कांद्याची आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये ४० ते ७० रुपयांनी त्याची विक्री होत होती.
किरकोळ मार्केटमध्येही कांद्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. मध्यम दर्जाचा कांदा ६० रुपये व चांगल्या दर्जाचा कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. सद्य:स्थितीत मुंबईमध्ये नाशिक, पुणे, अहमदनगरमधून कांद्याची आवक होत आहे. उत्पादक जिल्ह्यांमध्येच दर वाढल्यामुळे मुंबईमध्येही प्रतिदिन भाव वाढत आहेत.
सर्वच ठिकाणी कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन पीक येण्यासाठी वेळ असल्यामुळे उपलब्ध कांद्याचे दर वाढले असून अशीच स्थिती राहिली तर दसऱ्यापर्यंत किरकोळ मार्केटमध्ये कांदा शंभरी पार करण्याची शक्यता आहे.- अशोक वाळुंज, संचालक, कांदा-बटाटा मार्केट, मुंबई बाजार समिती