मुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:45 AM2018-11-17T11:45:56+5:302018-11-17T11:46:22+5:30
बाजारगप्पा : मुंबईमध्ये जवळपास दोन वर्षांपासून स्थिर असलेल्या डाळी व कडधान्याचे दर वाढू लागले आहेत.
- नामदेव मोरे (नवी मुंबई)
मुंबईमध्ये जवळपास दोन वर्षांपासून स्थिर असलेल्या डाळी व कडधान्याचे दर वाढू लागले आहेत. तूरडाळ होलसेल मार्केटमध्ये ५५ ते ८० रुपये व मूगडाळ ५६ ते ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. यावर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईकरांसाठी दोन वर्षांपासून चांगले दिवस सुरू होते. गहू, तांदूळसह डाळी, कडधान्याचे दर नियंत्रणामध्ये होते. डाळींचे दर घसरू लागल्यामुळे शासनाने आयातीवर बंदी घातली होती. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र, गुजरात व इतर राज्यांमधून मुंबईत डाळी व कडधान्ये विक्रीसाठी येत आहेत. दोन वर्षांमध्ये प्रत्येक डाळीचे दर होलसेल मार्केटमध्ये ५० ते ६५ रुपये किलो होते. अपवाद दोन ते चार रुपयांचा फरक पडत होता. परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये ५० ते ७५ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या तूरडाळीच्या दरामध्ये वाढ होऊन ती ५५ ते ८० रुपये झाली आहे. मूगडाळ ६० ते ७५ रुपयांवरून ६५ ते ८० रुपये किलो झाली आहे. चणाडाळीचे दरही ५० ते ६५ रुपयांवरून ५८ ते ७० रुपये किलो एवढे झाले आहेत. होलसेल मार्केटमध्ये चांगल्या डाळीचे दर दोन वर्षांमध्ये प्रथमच ८० रुपयांवर गेले आहेत.
यावर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही पाऊस समाधानकारक झालेला नाही. यामुळे डाळींचे उत्पादन घटणार आहे. भविष्यात टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेने डाळींचे दर वाढू लागले आहेत. पुढील महिन्यात नवीन पिकाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल व त्यावर बाजारभाव वाढणार की स्थिर राहणार, हे स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त तूरडाळीची आवक चांगली होती आहे. शुक्रवारी ३०० टन तूरडाळ विक्रीसाठी आली होती.
चणाडाळ ७७ टन, मसूरडाळ २७ टन, उडीदडाळ ५१ टन, मूगडाळ ६६ टन आवक होत आहे. बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार असल्यामुळे शेतकरीवर्ग आनंदात आहे. परंतु शासनाने बाजार समितीच्या बाहेरील अन्नधान्यावरील नियमन उठविले आहे. याचा गैरफायदा काही व्यापारी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीच्या बाहेर डाळी व कडधान्याचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याची भीती बाजार समितीमधील काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शासनाने डाळी व कडधान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आतापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे. वाढलेल्या बाजारभावाविषयी माहिती देताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शासनाने बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केटपुरते मर्यादित ठेवल्याचा परिणाम दिसू लागला आहे. कृषी मालाच्या व्यापारावर व साठ्यावर योग्य नियंत्रण ठेवले नाही तर कृत्रिम भाववाढ करण्याची भीतीही व्यक्त केली असून या महिनाअखेरपर्यंत मार्केटची स्थिती स्पष्ट होणार आहे. डाळी व कडधान्याचे दर वाढू लागले असले तरी ज्वारी, गहू, तांदूळ यांचे दर मात्र स्थिर असून त्यांची आवकही समाधानकारक होत आहे.