- नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशी मुंबई, नवी मुंबईमधील भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. भाजीपाल्याची आवक घटल्याने परिस्थितीचा गैरफायदा घेत विक्रेत्यांनी ग्राहकांना वेठीस धरले. मात्र आता संप निवळला असल्याने सोमवारपासून भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची आशा आहे. सध्या कोथिंबीर १२० रुपये जुडी व फरसबी १६० रुपये किलोवर पोहोचली आहे. फ्लॉवर, शेवगा, टोमॅटोचे दरही १२० रुपये किलो झाले आहेत. मुुंबईकरांना परराज्यातून येणाऱ्या भाजीपाल्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३ जूनला दिवसभरामध्ये ७१ ट्रक व १७८ टेंपोमधून भाजीपाल्याची आवक झाली आहे. मुंबई, नवी मुंबईकरांची मागणी व प्रत्यक्षातील आवक यामध्ये तफावत असल्याने बाजारभाव प्रचंड वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातून अत्यंत अल्प प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येऊ लागला आहे. विक्रीसाठी येणारा ९० टक्के माल हा आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्लीमधून विक्रीसाठी येऊ लागला आहे. लिंबू, आले या वस्तूही दक्षिणेकडील राज्यांतून येऊ लागल्या आहेत. मुंबईत निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे परराज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात माल मुंबईत पाठवत आहेत.५ रुपयांची पुदिना जुडी ३० रुपयांनामुंबई : शेतकरी संपापूर्वीचे दर आणि सध्याचे दर यात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा परिसरातील बाजारपेठेत आधी ५ रुपयांना मिळणाऱ्या पुदिना जुडीसाठी आता ३० रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. कोबी, फ्लॉवरचा दर ३० रुपये किलोवरून १०० रुपयांवर गेला आहे. १० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो ४० रुपये किलो झाले आहेत. ८ रुपयांना मिळणाऱ्या पालकच्या जुडीसाठी १५ रुपये द्यावे लागत आहेत.