मुंबईच्या नामांकित व्हीजेटीआय महाविद्यालयातील लज्जास्पद प्रकार समोर आलाय. परीक्षा फॉर्मवर सही घेण्यास गेलेल्या विद्यार्थिनीचा प्राध्यापकानंच विनयभंग केला. शरीरसुखाची मागणी करत नापास करण्याची धमकी या प्राध्यापकानं दिलीय. या प्रकरणी व्हीजेटीआय प्रशासनाकडे दि. १९ मे, २०१८ रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आलीय. या अर्जात सविस्तर म्हणणे पीडित विद्यार्थिनीने मांडले आहे. मात्र, तक्रार दाखल करून १० दिवस उलटले तरी प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. अखेर पीडित विद्यार्थिनीने युवासेनेकडे धाव घेतली आणि हा सर्व प्रकार समोर आला. तेव्हा महाविद्यालय प्रशासन टाळाटाळ करत संबंधित प्राध्यापकाला पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही या प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप झालेला आहे. मात्र तेव्हाही कारवाई झालेली नाही. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण शिक्षकांच्या हाती असतात. याचा गैरफायदा हे प्राध्यापक घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींवर अत्याचार करत असल्याचे दिसत आहे. याबाबत आता माटुंगा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब काकडे तपास करत आहे.या मुद्द्यावरून शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे आक्रमक झाल्या आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक संस्थेमध्ये विशाखा समिती असावी, असा नियम आहे. मात्र, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अद्यापही विशाखा समिती स्थापनच करण्यात आलेली नाही, असे गोऱ्हेंनी सांगितले. त्यामुळे सदर प्रकरणामध्ये दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी. सदर प्राध्यापकाला तातडीने निलंबित करण्यात यावे. तसेच महाविद्यालयात बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही निलम गोऱ्हे यांनी केली.
व्हीजेटीआय महाविद्यालयात प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; नापास करण्याची दिली धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:45 PM