शाळेची फी परवडत नाही; मुंबई पब्लिक स्कूल आहे ना!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:37 AM2024-01-02T10:37:46+5:302024-01-02T10:38:41+5:30
सात हजारांहून अधिक जागांसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांकरिता १ जानेवारीपासून अर्ज करण्यास सुरूवात .
मुंबई : महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई आणि आयबी शिक्षण मंडळ संलग्नित शाळांमधील सात हजाराहून अधिक जागांवरील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांकरिता १ जानेवारीपासून अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. मुलांना केंद्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये शिकवायचे असते, पण फी परवडत नाही, अशा पालकांकडून पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलला गेल्या काही वर्षात चांगला प्रतिसाद लाभतो आहे.
यंदा पाच नवीन सीबीएसई शाळा सुरू होणार आहेत. प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण २२ शाळांपैकी प्रत्येकी एक आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई शाळा असून उर्वरित सीबीएसईच्या शाळा आहेत. सीबीएसई व आयसीएसई मंडळाच्या शाळांमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ४० आहे. तर आयजीएसई व आयबीची ३० आहेत. एकूण जागांपैकी महापौरांच्या स्वेच्छाधिकाराच्या १० टक्के व मनपा कर्मचाऱ्यांकरिता ५ टक्के जागा राखीव असतील. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असेल.
प्रवेशाचे वेळापत्रक :
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : १ ते १५ जानेवारी
कागदपत्रांची छाननी व समुपदेशन : १० ते २२ जानेवारी
सोडतीसाठी विद्यार्थ्यांची यादी : २७ जानेवारी
सोडत : ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी
निवड झालेल्या पाल्यांची
निवड झालेल्या पाल्यांची प्रवेश नोंद : २९ फेब्रुवारीपर्यंत
शैक्षणिक सत्राची सुरुवात : एप्रिल २०२४
पालकांच्या मदतीसाठी कक्ष :
केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने ज्या पालकांकडे ही सुविधा उपलब्ध नाही, त्यांच्याकरिता संबंधित पब्लिक स्कूलमध्ये मदत कक्ष स्थापन्यात आले आहेत.
१ ते १५ जानेवारी दरम्यान सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:३० या वेळेत सोमवार ते शनिवार या मदत कक्षांवर पालकांना साहाय्य करण्यास कर्मचारी उपलब्ध असतील.
या ठिकाणी पालकांकरिता मदतकक्ष असतील :
चिकूवाडी (बोरीवली), जनकल्याण नगर (मालाड), प्रतीक्षा नगर (जोगेश्वरी), मीठागर (मुलुंड), हरियाली विलेज (विक्रोळी), राजावाडी (घाटकोपर), अजिज बाग (चेंबूर), तुंगा विलेज (पवई), भवानी शंकर रोड (दादर), काणे नगर (सायन), पूनम नगर (अंधेरी (पू), वूलन मिल (माहीम), एल के. वाघजी (माटुंगा), विलेपार्ले (पू), जिजामाता नगर, आशिष तलाव (वडवली), एम.जी.क्रॉस रोड क्र.१, बोरा बझार, शांती नगर, नटवरलाल पारेख कंपाऊंड, मालवणी टाऊनशिप (मालाड), वीर सावरकर मार्ग (वर्षा नगर) या ठिकाणी पालकांकरिता मदतकक्ष असतील.