Join us

मुंबई, पुण्यासह नाशिकही गारठले; यंदा पुन्हा बर्फाची चादर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 1:03 AM

राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर गारठला आहे.

मुंबई :  नोव्हेंबर महिना पुढे सरकत आहे तशी थंडी आणखी वाढत आहे. दिवाळीच्या तोंडावर गारठ्यात भर पडली असून मुंबई, पुण्यासह नाशिकही गारठले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ९.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस आहे. पहाटेच्या गारव्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे.

राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर गारठला आहे. पुण्यासह नाशिकमध्ये थंडीने कहर केला असून, गेल्या ४ दिवसांपासून पुणे आणि नाशिकचे किमान तापमान सातत्याने १० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तर मुंबईचे किमान तापमान २२ ते १९ अंश नोंदविण्यात येत असून आहे. महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांगली, नांदेड, उस्मानाबाद, मालेगाव, सातारा, बारामती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जालना येथील किमान तापमान १५ अंशाखाली घसरले.

दिवाळीत थंडीचा असर होणार कमी

पुढील दोन दिवस तापमानात हळूहळू वाढ होऊ लागेल. दिवाळीत थंडी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, सध्या उत्तर पूर्वेकडून हवा दक्षिणेच्या दिशेने वाहत आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती थंड हवेच्या लाटेच्या जवळपास जाणारी आहे.

टॅग्स :मुंबई