मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचचे बुकिंग फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:05 AM2021-06-27T04:05:18+5:302021-06-27T04:05:18+5:30
प्रवाशांना मिळाली नदी, खोरे, धबधब्यांसह निसर्गसाैंदर्याची अनुभूती घेण्याची संधी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एलएचबी कोचसह मुंबई - पुणे ...
प्रवाशांना मिळाली नदी, खोरे, धबधब्यांसह निसर्गसाैंदर्याची अनुभूती घेण्याची संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एलएचबी कोचसह मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेस विशेष शनिवार, २६ जून रोजी धावली. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे, यामुळे प्रवाशांना नदी, खाेरे, धबधब्यांसह निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटता आला. विस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, सर्व ४४ सीट्स बुक होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेतला. यावेळी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केकही कापला. ठरलेल्या वेळेत ही गाडी पुण्यात पोहोचली. विस्टाडोम कोचमुळे माथेरान टेकडी (नेरळजवळील), सोनगीर टेकडी (पळसधारीजवळ), उल्हास नदी (जांबरूंगजवळ), उल्हास खोरे, खंडाळा, लोणावळा येथील भाग आणि दक्षिण पश्चिम घाटावरील धबधबे, बोगद्यांजवळून जाताना निसर्गरम्य दृश्य पाहण्याची संधी प्रवाशांना मिळाली.
उमेश मिश्रा आपल्या पत्नी व मुलासमवेत प्रवास करत होते. आतापर्यंत केवळ परदेशात उपलब्ध असलेला विस्टाडोम कोच येथे सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले. मोठ्या खिडक्या आणि फिरू शकणाऱ्या आसनांमुळे त्यांच्या मुलाला हा प्रवास खूपच आवडला. दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, तो मुंबई आणि पुणेदरम्यानचा नियमित प्रवासी असून, विस्टाडोम कोच जोडल्याने भोर घाटातील प्रवास अधिक आनंददायक झाला आहे.
तर विस्टाडोममध्ये प्रवास करणाऱ्या सायली यांनी सांगितले की, त्यांना मोठ्या खिडकीच्या पॅनलमधून निसर्ग पाहण्याची मजा घेता आली. शिवाय पावसाळ्यातील हिरवळीमुळे हा आनंद द्विगुणित झाला.
* प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे प्रयत्नशील
मुंबई - पुणे मार्गावर, विशेष डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पारदर्शक आणि मोठ्या खिडक्या असलेला विस्टाडोम कोच प्रवासाचा आनंद वाढवत आहे. यातून प्रवास करणारे सुखद अनुभव सांगत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी, त्यांना जागतिक दर्जाचा अनुभव घेता यावा व प्रवासादरम्यान विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे.
- पियुष गोयल, रेल्वेमंत्री
----------------------------------------------