कंत्राटी कामगार रोखणार मुंबई- पुणे महामार्ग
By Admin | Published: March 1, 2015 12:43 AM2015-03-01T00:43:05+5:302015-03-01T00:43:05+5:30
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगार न्याय हक्कासाठी संघटीतपणे लढा देत आहेत.
मोहोपाडा : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगार न्याय हक्कासाठी संघटीतपणे लढा देत आहेत. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची कंपनीने दखल घेतली नसल्याने आझाद मैदानावर राज्यातील 30 कामगार संघटनांनी एकत्र येऊन लढा अधिक तीव केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुणे - मुंबई द्रुतगती मार्ग तसेच गोवा महामार्ग आणि जुना पुणे - मुंबई मार्ग पुर्ण बंद करू असा इशारा ाझाद मैदान येथील निर्धार मेळाव्यात दिला.
कंत्राटी कामगार गेली 25 वर्षे अन्याय होत असल्याचा आरोप करीत असून त्यांनी उग्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. या लढ्यात राज्यातील अनेक कामगार संघटना सहभागी होणार असल्याचे आॅल इंडिया युनियन आणि जनरल कामगार संघटनेचे सचिव निवास पत्की यांनी सांगितले.
कामगारांचे किमान वेतन मासिक 15000 ते 20000 हजार, सर्व कामगारांना पेन्शन, सामाजिक सुरक्षा, कंत्राटी कामगार प्रथा थांबवा तसेच अनेक वर्षाची थकबाकी द्यावी, या मागण्या करण्यात आल्या.
भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडीक, आयटकचे सुकुमार दामले, श्रीनिवास पत्की,सीआरएमएसचे भटनागर, सीआयटीयूचे वर्तक, विश्वास उटगी यांसह कामगार आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. (वार्ताहर)