मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसची रखडलेली चाचणी होणार २६ जूनपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 03:02 AM2019-06-13T03:02:17+5:302019-06-13T03:02:49+5:30
कर्जत थांबा रद्दच : मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती, तांत्रिक बिघाडामुळे विलंब
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन जोडून २६ जूनपर्यंत चाचणी घेतली जाणार आहे. मात्र आता इंटरसिटीला मिळणारा कर्जत थांबा रद्द केला आहे. त्यामुळे कर्जत येथील प्रवाशांना इंटरसिटीच्या प्रवासाला मुकावे लागणार आहे.
इंटरसिटी एक्स्प्रेसची चाचणी ३० मे ते ६ जूनपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे पूश-पूल इंजीन लावून चाचणी घेणे लांबणीवर गेले. मध्य रेल्वे प्रशासन आता १२ जून ते २६ जून या कालावधीमध्ये इंटरसिटीची चाचणी घेणार आहे. दरम्यान, मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात १५ दिवसांतच बदल करण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी पूश-पूल चाचणी घेण्यात आली. त्या वेळी ती सीएसएमटीहून सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटत होती. तर पुणे येथे ती ९ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल, असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र इंटरसिटीचा कर्जत थांबा रद्द करूनसुद्धा पुण्याला ती पोहोचण्यास नियोजित वेळेच्या २० ते ३० मिनिटांचा उशीर लागत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
असे असेल नवे वेळापत्रक
एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दादर येथे सकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी, ठाणे येथे सकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी, लोणावळा येथे सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी, शिवाजी नगर येथे सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी तर, पुणे येथे सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. यामधील कर्जत येथे बँकर इंजीन लावण्यासाठी थांबा घेतला जात होता. मात्र आता पूश-पूल इंजीन लावण्यामुळे कर्जत येथील थांबा रद्द केला आहे. मात्र यामुळे कर्जत येथून पुणे गाठणाºया प्रवाशांचे हाल होणार आहेत.