मुंबई-पुणे-मुंबई ! आता 20 मिनिटांत पुणेकरांच्या भेटीला, हेलिकॉप्टर टॅक्सी आली रे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:20 PM2018-12-29T12:20:50+5:302018-12-29T12:26:05+5:30
अमेरिकेतील फ्लाय बेड नावाच्या हॅलिकॉप्टर सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.
मुंबई - मुंबई-पुणे-मुंबई आणि पुणे-मुंबई-पुणे हा प्रवास म्हणजे लाखो लोकांची गरज बनली आहे. विशेष म्हणजे हा प्रवास दैनिक स्वरुपात करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यासाठी केवळ 15 मिनिटांत मुंबईहून पुणे गाठणाऱ्या हायपरलूप तंत्रज्ञानाची रेल्वे सुविधा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यातच, आता आगामी वर्षात मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टर टॅक्सीसेवा सुरू होत आहे. त्यामुळे केवळ 20 मिनिटांत आता मुंबईहून पुण्याला पोहोचता येईल.
अमेरिकेतील फ्लाय बेड नावाच्या हॅलिकॉप्टर सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. मुंबईहून पुण्यासह, शिर्डी आणि इतर जवळील ठिकाणांवरही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी, कंपनीने भारतातील एका कंपनीसोबत करार केला असून ब्लेड इंडिया नावाने नवीन कंपनी सुरू केली आहे. मुंबईतील जुहू आणि महालक्ष्मी परिसरातून हे हॅलिकॉप्टर उड्डाण घेईल. त्यानंतर, केवळ 20 मिनिटांत ते हेलिकॉप्टर पुण्यात पोहोचेल.
ब्लेड इंडिया अॅपद्वारे प्रवाशांना या सेवेचे बुकींग करता येणार आहे. सध्या या प्रवासाचा दर निश्चित करण्यात आला नाही. मात्र, लवकरच याबाबत संबंधित कंपनीच्या अॅप आणि वेबसाईटवरुन भाड्यासंदर्भात माहिती देण्यात येईल. विशेष म्हणजे खासगी जेटपेक्षा या हेलिकॉप्ट टॅक्सीचे भाडे खूप कमी असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीस वीकेंडला लक्ष्य ठेवून या हेलिकॉप्टर फेऱ्यांची सेवा पुरविण्यात येणार आहे.
दरम्यान, यापूर्वी बंगळुरुमध्ये विमानप्रवाशांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर टॅक्सी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांना 15 मिनिटांमध्ये विमानतळावरुन घरी जाण्यासाठी व तेथून घरी येणे शक्य बनले आहे. त्याच धर्तीवर मुंबई-पुणे आणि पुणे मुंबई वाहतूक सेवांचा वाढता अंदाज घेऊन ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.