मुंबई-पुणे रेल्वे मार्ग सुरळीत होण्यासाठी करावी लागणार आठवडाभराची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 06:37 AM2019-08-14T06:37:40+5:302019-08-14T06:37:54+5:30

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील घाट भागात नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरूच आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी २४ तास काम केले जात आहे. त्यामुळे १६ आॅगस्टपासून मेल, एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

The Mumbai-Pune railway line will have to wait a week for smooth operation | मुंबई-पुणे रेल्वे मार्ग सुरळीत होण्यासाठी करावी लागणार आठवडाभराची प्रतीक्षा

मुंबई-पुणे रेल्वे मार्ग सुरळीत होण्यासाठी करावी लागणार आठवडाभराची प्रतीक्षा

Next

मुंबई : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील घाट भागात नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरूच आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी २४ तास काम केले जात आहे. त्यामुळे १६ आॅगस्टपासून मेल, एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होत असल्याने हा मार्ग संपूर्ण सुरळीत होण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

घाट भागातील रेल्वे मार्गावर तीन फूट मातीचा ढीग साचला होता. तो जेसीबी आणि कर्मचाऱ्यांकडून हटविण्यात येत आहे. रेल्वे मार्गाखालील आणि लगतची खडी वाहून गेल्याने तेथे काम सुरू आहे. रेल्वे मार्गालगत सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. दरड कोसळण्याच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्यात येत आहेत. यासाठी घाट भागात २५० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत. रेल्वे मार्गावरील ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर गाडी चालवण्याची चाचणी घेतली जाईल. त्यानंतरही वाहतूक सुरू झाल्यावर या मार्गावरील रेल्वेसेवा पूर्वपदावर यायला आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कारण त्या भागातून काही दिवस गाड्या कमी वेगाने चालवाव्या लागतील.

जून महिन्यापासून घाट भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र मुसळधार पाऊस आणि वारंवार कोसळणाºया दरडींमुळे तिन्ही रेल्वे मार्गांवर मातीचा ढीग जमा झाला. रेल्वे मार्गावर मोठमोठे दगड पडल्याने रेल्वे मार्ग दुरुस्त करण्यासाठी २६ जुलै ते ९ आॅगस्टपर्यंत मेल, एक्स्प्रेसच्या १८ फे-या रद्द केल्या. मात्र या कालावधीत काम पूर्ण होऊ शकले नाही. आता १६ आॅगस्टपासून येथील एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे मार्ग १३ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणा-यांचे हाल झाले आहेत. चेन्नई, हैदराबाद यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग ठप्प झाला आहे.

१६ आॅगस्टला रेल्वे मार्ग सुरू करण्यास प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. दरड प्रवण भागातील प्रत्येक ठिकाणाचा आणि घटनेचा आढावा घेण्यासाठी घाट भागात ड्रोनचा वापर केला जात आहे. मंगळवारी मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी लोणावळा घाट भागाची पाहणी केली.

Web Title: The Mumbai-Pune railway line will have to wait a week for smooth operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.