Mumbai: राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा जामीन मंजूर
By दीप्ती देशमुख | Published: August 21, 2023 05:26 PM2023-08-21T17:26:23+5:302023-08-21T17:41:05+5:30
Mumbai: राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई - राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आजच्या सुनावणीला उद्धव ठाकरे स्वतः न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांचे त्यांनी खंडन केले. तर संजय राऊत प्रत्यक्षात न्यायालयात हजर होते. दोघांनीही न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या दोघांचा जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी १४ सप्टेंबर रोजी ठेवत न्यायालयाने त्यावेळीही उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
काय आहे प्रकरण
खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली होती. दुबईतील कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये राहुल शेवाळे यांची गुंतवणूक असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला होता. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचे म्हणत राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल दाखल केली.