Mumbai Rail Roko : विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तासभर उशिरा पोहोचण्याची मुभा, मुंबई विद्यापीठाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 12:09 PM2018-03-20T12:09:44+5:302018-03-20T13:47:29+5:30
रेल्वे अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी मध्य रेल्वेवरील दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या.
मुंबई - रेल्वे अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी मध्य रेल्वेवरील दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या. या रेल रोको आंदोलनाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला आहे. विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागला. आजपासून बीए , बीकॉम , बीएस्सी व इतर प्रथम व द्वितीय वर्षांच्या पुनर्परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या आंदोलनाचा फटका बसला आहे. अशा विद्यार्थ्यांनी तासभर उशीरानं परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठानं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आपल्या मागण्यांसाठी रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. सकाळी 7 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. माटुंगा-दादर रेल्वे स्टेशनदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकल, एक्स्प्रेस अडवून ठेवल्या होत्या. आंदोलनामुळे सीएसटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला.
रेल रोकोची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रेल्वे रुळ सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिसांनी लाठीचार्च केल्यानं विद्यार्थ्यांनी लोकलवर दगडफेकही केली होती.
या आहेत प्रशिक्षणार्थींच्या मागण्या?
- रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के असलेला कोटा रद्द करावा
- रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
- रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा
- यासंदर्भात महिन्याभरात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये
अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रेल रोको घेतला होता. महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.