मुंबई - लोहमार्ग आयुक्तालयाचे हद्दीत मुंबईतून कोकणात जाणाऱ्या मेलगाड्यांवर दरम्यानच्या काळात अनेक सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. त्यानुसार पोलिसांनी गेल्या 2 महिन्यांपासून पनवेल ते मुंबई असा कोकणातून येणाऱ्या एक्सप्रेसमधून पेट्रोलिंग करुन आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तर प्रदेशातून आलेला आरोपी मोहमद सैफ याला ठाणे लोहमार्गचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चोपडे यांच्या पथकाने संशयास्पद हालचालीवरुन ताब्यात घेतले. सदर आरोपीकडून अधिक तपास केला असता तो सराईत सोनसाखळी चोर असल्याची माहिती चौकशीत उघड झाली. कोकणातून येणाऱ्या एक्सप्रेसमधील चोरी केल्याचंही माहिती पोलिसांनी मिळाली. हा आरोपी रात्री तसेच पहाटेच्या वेळी मेलगाडीतून प्रवास करताना दरवाज्याकडे बसलेल्या प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून गाडीतून पलायन करायचा. आरोपीकडे चौकशी केली असता तो चोरी करण्यासाठी मुंबईत आल्यानंतर धारावी येथे भाड्याने राहत होता. चोरी केल्यानंतर सोन्याचे दागिने पनवेल येथील सोने गाळणीचे काम करणाऱ्या साबीर शेख यास विकत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी साबीर शेखला ही अटक केली आहे.
आरोपी मोहमद सैफ हा मुळचा गाजियाबाद, उत्तर प्रदेश येथील राहणारा असून तो मागील 3 वर्षापासून मुंबईत अशाप्रकारे गुन्हे करीत होता. मुंबईस आल्यानंतर भाड्याच्या घरात राहून 1 महिना चोऱ्या करुन त्यातून मिळणारी रक्कम घेऊन गावाकडे परत जात असे. त्यानंतर पुन्हा मुंबईत येऊन अशाचप्रकारे चोऱ्या करीत असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं. आरोपी मोहमद सैफकडे चौकशी केली असता तो मुंबईमध्ये मॉडेलिंग करण्यासाठी आणि फिल्मस्टार बनण्यासाठी मुंबईत आलेला होता. परंतु त्याला त्याच्या परिस्थितीमुळे कामात यश न आल्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला असल्याचे सांगितले. न्यायालयाने या आरोपीला पोलीस कोठडीत पाठवले आहे.