Join us

Mumbai Rain Updates: ६ उदंचन केंद्रांनी १० तासात उपसले ४४२ कोटी लीटर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 5:19 PM

Mumbai Rain Havy: वरळी परिसरातील 'लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन' द्वारे १०२ कोटी लिटर पाण्याचा उपसा; बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ उदंचन केंद्रांमध्ये कार्यरत आहेत मोठ्या क्षमतेचे ४३ पंप

मुंबई : मुंबईची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अतिवृष्टीच्या काळात शहरात पडणा-या पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी महापालिका क्षेत्रात एकूण ६ उदंचन केंद्र कार्यान्वित आहेत. या ६ उदंचन केंद्रांमध्ये मोठ्या क्षमतेचे एकूण ४३ उदंचन संच अर्थात 'पंप' कार्यरत आहेत. दि. १७ जुलै ‌रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसादरम्यान मुंबईत पडणारे पावसाचे पाणी खेचून ते समुद्रात टाकण्याचे काम महापालिकेच्या उदंचन केंद्राद्वारे अव्याहतपणे करण्यात आले. या साधारणपणे १० तासांच्या कालावधी दरम्यान ४४२.३५ कोटी लिटर (४४२३.५० दशलक्ष लीटर) इतके पाणी पंपाद्वारे खेचून ते समुद्रामध्ये टाकण्यात आले आहे, ज्यामुळे मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठी मदत झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पी. वेलरासू यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पडणा-या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), ईर्ला (जुहू) आणि गज़धरबंध (सांताक्रुज पश्चिम) याठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे ६ उदंचन केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमध्ये एकूण ४३ पंप आहेत. या प्रत्येक पंपाची क्षमता ही प्रत्येक सेकंदाला ६ हजार लिटर पाण्याचा निचरा करण्याची आहे. याचाच अर्थ ६ उदंचन केंद्रांमधील ४३ पंपांची पाणी उपसा करण्याची अधिकतम क्षमता ही प्रत्येक सेकंदाला २ लाख ५८ हजार लिटर एवढी आहे. तथापि, पावसाचे व उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणा-या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हे पंप कार्यरत होतात...वरील नुसार शनिवार, दिनांक १७ जुलै रोजी रात्री ११ ते रविवार, दिनांक १८ जुलै २०२१ रोजी सकाळी ९ पर्यंतच्या, म्हणजेच सुमारे १० तासांच्या कालावधीदरम्यान ६ उदंचन केंद्रांद्वारे एकूण ४४२.३५ कोटी लिटर (४४२३.५० दशलक्ष लिटर) पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या अंतर्गत हाजीअली उदंचन केंद्राद्वारे ७४.५६ कोटी लिटर (७४५.५६ दशलक्ष लिटर), लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राद्वारे १०२.९८ कोटी लिटर (१०२९.७८ दशलक्ष लिटर), क्लीव्हलॅंड उदंचन केंद्राद्वारे ६८.९४ कोटी लिटर (६८९.४० दशलक्ष लिटर), ब्रिटानिया उदंचन केंद्राद्वारे ४१.७९ कोटी लिटर (४१७.९६) दशलक्ष लिटर, इर्ला उदंचन केंद्राद्वारे ९५.७३ कोटी लिटर (९५७.२४ दशलक्ष लिटर आणि गज़धरबंध उदंचन केंद्राद्वारे ५८.३६ कोटी लिटर (५८३.५६ दशलक्ष लिटर) इतक्या मोठ्या प्रमाणातील पावसाच्या पाण्याचा निचरा या उदंचन केंद्राद्वारे करण्यात आला आहे, अशीही माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई