मुंबई, दि. 19 - अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासननं घेतला आहे. हा दिवस दिवाळीच्या सुटीत भरून काढण्यात येईल अशी घोषणा अखेर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. या बद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी याची सूचना जारी करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.
सोमवारपासून पुढील तीन दिवस मुंबईसह कोकण परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला होता. दुपारी मुंबईत ढग दाटून आल्याने अंधार झाला. यामुळे मुंबईकरांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले. मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईत (कुलाबा) तब्बल १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.
ऑगस्टमध्ये पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले होते. मंगळवारी पावसामुळे पुन्हा अडकणार की काय अशी भीती मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली. पावसाची सुरुवात होताच मुंबईतील अनेकांनी घर गाठण्यासाठी लवकर ऑफीसमधून निघण्याचा निर्णय घेतला. रस्ते वाहतुकीवर पावसाचा किरकोळ परिणाम झाला असला तरी अद्याप पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतूक बंद झाल्याचा प्रकार समोर आलेला नाही. सीप्झ ते हिरानंदानी पवईदरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. घणसोली सब वेमध्ये पाणी साचल्याचे वृत्त आहे.
येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा
कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे़. येत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्या इशारा हवामान विभागाने दिला आहे़ हर्णे येथे गेल्या ३२ तासात तब्बल ५२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. अरबी समुद्रात दक्षिण गुजरात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून गोवा ते कर्नाटक किनारपट्टी परिसरात हवेचा कुंड तयार झाला आहे़ त्याचा परिणाम होऊन कोकण, गोवा, गुजरात परिसरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे़ त्याचवेळी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, झारखंड, छत्तीसगड, सिक्कीम, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालंड, मणीपूर, मेझोराम, त्रिपुरा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
मुसळधार पावसामुळे लँडिगवेळी विमानाची चाकं रुतली चिखलात, प्रवासी सुखरुप
मुंबई विमानतळावर वाराणसी-मुंबई विमानाची चाकं चिखलात रुतली असून प्रवासी विमानात अडकले आहेत. विमानातील 183 प्रवाशी आणि क्रू मेंबर सुरक्षित आहेत. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा पाणी साचल्यामुळे विमानसेवेवरही याचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर पाणी साचाल्यामुळे आणि खराब हवामानामुळे अद्याप एकाही विमानाचे उड्डाण झाले नसल्याचे सांगण्यात येते. तसेच, चार विमाने वळविण्यात आली असल्याची माहिती सीएसआयएच्या अधिका-यांकडून मिळते.
कोकणासह ठाणे जिल्ह्यात होणार अति सतर्कतेचा ईशाराठाणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणसह ठाणे जिल्ह्यात अतिव्रुष्टी होण्याची शक्येता, सर्व तहसीलदारांमार्फत जिल्ह्यात सतर्कतेचा ईशारा देण्यात आला. कार्यालयातील सर्व हजर व गैरहजर कर्मचार्यांची नोंद घेण्यात आली. पुढील 48 तासात पावसाचार जोर कायम राहणार आहे. समुद्र खवळलेले राहणार असून जीव घेण्या लाठांसह उसळणार असल्याने काठावरच्या गावाना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.