मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. लोकल गाड्या 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, मुंबईकरांसोबत नेत्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आज मुंबईत असून त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र. ती पावसामुळे रद्द करण्यात आली. तसेच, या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना संबित पात्रा आणि महाराष्ट्रातील भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची चांगलीच तारांबळ उडाली. दादरमध्ये चक्क त्यांना हातात बूट घेऊन पायपीट करण्याची वेळ आली.
याचबरोबर, सायन, माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरला पावसानं चांगलंच झोडपले आहे.