Join us

डबेवाल्यांचं समाजभान, भर पावसात एक हजार गोरगरिबांना अन्नदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 1:27 PM

भर पावसात मुंबईच्या डबेवाल्यांनी रोटी बँकेमार्फत एक हजार गोरगरिबांना अन्नदान केले आहे. 

मुंबई : मुंबईकरांना दररोज न चुकता वेळेवर डबा पोहोचवणारे 'मॅनेजमेंट गुरू' म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे डबेवाले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अंधेरी पूल दुर्घटनेमुळे अंधेरी ते विरारदरम्यान डबेवाले अडकून पडले होते. त्यामुळे मंगळवारी (3 जुलै) डबे पोहोचवण्याची सेवा खंडित झाली होती. परंतु त्याच वेळी अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून समाजभान राखत भर पावसात मुंबईच्या डबेवाल्यांनी रोटी बँकेमार्फत एक हजार गोरगरिबांना अन्नदान केले आहे. 

 

मुंबईचे डबेवाले रोटी बँक चालवतात. या बँकेच्या माध्यमातून हजारो भुकेलेल्यांना डबेवाले दररोज अन्नपुरवठा करतात. मंगळवारी देखील या रोटी बँकेच्या माध्यमातून पावसात अडकलेल्या एक हजार लोकांना अन्न वाटप केले गेले. याआधीही डबेवाल्यांनी रोटी बँकेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना अन्नदान केले आहे. मुंबईकरांना डबे पोहोचवण्याच्या सेवेत कधीही खंड पडू, यासाठी मुंबईचे डबेवाले नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे जगभरात कौतुक होत असते. 

 

अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक मंगळवारी पूर्णतः ठप्प झाली होती. अंधेरी पूल दुर्घटनमुळे डबेवाल्यांची साखळी खंडित झाल्याची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली होती. त्यानंतर 'विरार ते चर्चगेटदरम्यान आमची सेवाही बाधित झाल्याने आम्ही तात्काळ आमच्या सहकाऱ्यांना डबे आणायला सांगितले आणि त्याचे गोरगरिबांसह रेल्वे प्रवासात अडकलेल्या प्रवाशांमध्ये वाटप केले. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून आम्ही त्याचं वाटप केलं. रेल्वे प्रवासात आणि पावसात अडकलेल्या 1 हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला,' असंही तळेकर यांनी सांगितलं.

टॅग्स :मुंबई डबेवालेपाऊस