मुंबई : राज्यातील विविध भागांत गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेले दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले. यानंतर आता मुंबईतही पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून सुरु असलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच, या पावसामुळे कुर्ला,सायन,चुनाभट्टी या ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 20 - 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू आहे. मुंबईसह ठाणे व नवी मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे.
मुंबईत गुरुवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे शहरातील काही भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, सायनचे गांधीमार्केट परिसरातही पाणी साचले आहे. सायनमध्ये पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्याने बेस्टचे अनेक मार्ग अन्यत्र वळविण्यात आले आहेत. बेस्ट बस कडून देखील पाणी साचलेल्या भागांची यादी देत ज्या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे, त्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग शहरात येत्या तीन तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्गातही काहीशा विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात केली आहे.
हवामान विभागाकडून केएस होसाळीकर यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगर आणि ठाणे भागात आभाळ भरून आलेले आहे. या भागात पुढील 3-4 तास अति मुसळधार पाऊस बरसू शकतो. तर मुंबई प्रमाणेच कोकण किनारपट्टी वर देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.