LIVE: मुंबईत दमदार पाऊस; मध्य रेल्वे विस्कळीत, रस्ते वाहतूकही मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 07:04 AM2018-06-07T07:04:52+5:302018-06-07T13:09:08+5:30
घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलूंड अंधेरी, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या पट्ट्यात पावसाचा जोर आणखीनच जास्त आहे.
मुंबई: हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी पहाटेपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने बऱ्यापैकी जोर धरला आहे. घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलूंड अंधेरी, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या पट्ट्यात पावसाचा जोर आणखीनच जास्त आहे.
मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानंतर आज सकाळपासून मुंबईसह इतर परिसरात पावसाची संततधार सुरु झाली आहे. परंतु, हवामान खात्याने अद्याप मान्सूनने मुंबईत प्रवेश केल्याचे अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही.
दरम्यान, आता या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकलसेवा सुरळीत राहणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तुर्तास मध्य आणि पश्चिम रेल्वेसेवा सुरळीत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शुक्रवार ७ जून ते सोमवार ११ जून या कालावधीत राज्यात विशेषत: कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ७ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार, ८ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून, वर्तविण्यात आली आहे.
शनिवार, ९ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. १० व ११ जून रोजी मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानंतर, राज्य आपत्ती निवारण कक्षाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व जिल्ह्यातील प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Live updates:
* मुंबईतील दादर, परळ, हिंदमाता आणि अन्य सखल परिसर जलमय
Maharashtra: Heavy rain lashes #Mumbai leaving streets water-logged in several parts of the city. Visuals from Hindmata area. pic.twitter.com/rAUBIYQPFr 9W-117 Jet airways London-Mumbai flight diverted to Ahmedabad airport due to heavy rain in Mumbai. It will make a landing around 1 pm. pic.twitter.com/793MKZU9Eb
* पावसाचा जोर वाढला; मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, अप-डाऊन दिशेच्या गाड्या 15 मिनिटे उशिराने
* सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात; रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला
* मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात; दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
* मुंबईत पावसाची विश्रांती; लोकल व रस्ते वाहतूक सुरळीत
* पावसाने जोर धरला असला, तरी मुंबईतील रस्त्यावर सध्यातरी कुठेही पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या नाहीत.
* लालबाग, परळ, दादर, माहिम, वांद्रे या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे.
* येत्या 24 तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज
* मुंबईच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह दमदार पाऊस
* दक्षिण मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार
* जुहू समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात बुडून एकाचा मृत्यू