मुंबई - काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसा पावसाळ्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतो. मात्र एका रात्रीत एवढा पाऊस पडेल याचा अंदाज कुणालाच नव्हता. (Mumbai Rain Live Updates) गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai) संततधार धरली आहे. शुक्रवारी मुंबईत २५३ मिलीलीटर पाऊस पडला होता. त्यानंतर शनिवारी २३५ मिलीलीटर आणि रविवारी रात्री तब्बल २७० मिलीलीटर पावसाची नोंद झाली. अशी मिळून तीन दिवसांमध्ये मुंबईत ७५० मिलीलीटर एवढा पाऊस पडला. गेल्या १२ वर्षांत जुलैमध्ये एकाच दिवसांत एवढा पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे.( Mumbai was hit by clouds twice as high as Mount Everest, with record rainfall)
दरम्यान, हवामान विभागाच्या डोप्लर रडारमधून पावसाबाबत जे चित्र मिळाले ते भाीतीमध्ये भर घालणारे आहे. रडारला मुंबईवर तब्बल १८ किमी म्हणजेच ६० हजार फुटांहून अधिक उंचीचे ढग दिसून आले. या ढगांची उंची माऊंट एव्हरेस्टपेक्षा दुप्पट आहे. एव्हरेस्टची उंची ही सुमारे ९ हजार किलोमीटर एवढी आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार मुबईमध्ये एका तासामध्येच सुमारे १५० मिलीलीटर पाऊस झाला. ढागांचे भलेमोठे आच्छादन रायगड जिल्ह्यावर तयार झाले होते. ते पुढे मुंबईच्या दिशेने गेले.
आयआयटी मुंबईमध्ये हवामानावर लक्ष ठेवणारे तज्ज्ञ श्रीधर बालासुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, आयआयटीमध्ये केवळ तीन तासांमध्ये २५० मिमीपेक्षा अधिक पाऊस पाडला. सकाळी ७ वाजेपर्यंत ३०५ मिमी एवढा पाऊस झाला. त्यांनी ट्विट केले की, सुदैवाने हा मुसळधार पाऊस अशावेळी झाला जेव्हा वाहतूक आणि लोकांची येजा कमी होती.
दरम्यान, आजच्या पावसाने २६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाची आठवण ताजी केली. त्यावेळी मुंबईमध्ये २४ तासांत ९४४ मिमी पाऊस पाऊस पडला होता. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय हवामान विज्ञान विभाग (आयएमडी) ने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने सकाळी प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये सांगितले की, हवामानातील बदलांमुळे मुंबईत सहा तासांत १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला. दरम्यान हमामान विभागाने शहरासाठीच्या पावसाच्या अंदाजाला ऑरेंजमधून रेड अलर्टमध्ये बदलले आहे.
आयएमडीच्या आकडेवारीनुसार अतिवृष्टीचा अर्थ २४ तासांत २०४. मिमी पाऊस आणि मुसळधार पावसाचा अर्थ ११५ मिमी ते २०४ मिमीदरम्यानचा पाऊस असा होतो. शनिवारी रात्रीच्या नोंदीनुसार आयएमडीने सांताक्रूझमध्ये २१३ मिमी, बांद्रा येथे १९७.५ मिमी आणि कुलाबा येथे १७४ मिमी पावसाची नोंद केली होती.