मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीच्या ११ दिवसांमध्येच ५०५ मिमी या मासिक सरासरी एवढ्या पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे. (Rain In Mumbai) मुंबईमध्ये गेल्या ११ दिवसांत ५६५.२ मिमी पर्जन्यवृष्टी नोंदवली गेली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासून ते मंगळवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान, २०० मिमी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागात रविवारी पर्जन्यवृष्टीसाठीचा हायअलर्ट घोषित केला आहे. ( A more than monthly average rain fell in Mumbai in just 11 days, the weather department warned)रविवारी राज्यातील काही भागांमध्ये २४ तासांत २०४.५ मिमीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत मुंबईसह कोकण परिसरात पर्जन्यवृष्टीसाठीचा ऑरेंजअलर्ट जारी करण्यात आला आहे. सांताक्रूझ येथील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत मुंबईत १०७ मिमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण-पश्चिम मान्सुनची मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेने शुक्रवारी रात्री ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत केवळ २३.४ मिमी पावसाची नोंद केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मुसळधार पावसानंतरही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्या पाण्याची टंचाई कायम आहे. या जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या केवळ १२.६८ टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १३.६३ टक्के एवढा होता. दरम्यान, हवामान विभागाकडून मिळालेल्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. सखल भाग आणि मिठी नदीजवळ राहणाऱ्यांना सुरक्षित जागी हलवण्याची तयारी केली जात आहे. यादरम्यान वॉर्ड कार्यालयांना पडलेले वृक्ष हटवण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Mumbai Rain: मुंबईत ११ दिवसांमध्येच पडला महिन्याभराचा पाऊस, हवामान खात्याने दिला असा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 8:39 AM