मुंबई - मुंबई शहर आणि उपनगराला शनिवारी झोडपून काढलेल्या पावसाने रविवारी चकवा दिला. मात्र, मान्सूनदरम्यानची पडझड सुरूच आहे. रविवार, १० जून रोजी सकाळी ८ वाजता दादरमधल्या शिवाजी पार्क येथे झाड कोसळून चार जण जखमी झाले. माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात चारही जखमींवर उपचार करण्यात आले असून, जखमींपैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर श्रेया राऊत या २० वर्षांच्या तरुणीवर उपचार सुरू आहेत.रविवारी सकाळीच मुंबईसह उपनगरात ढग दाटून आले होते. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाने उघडीप घेतली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांसह मुंबई शहरात किंचित कुठे तरी पडलेले पावसाचे थेंब वगळता दिवसभर पाऊस नव्हता. विशेषत: उन्हासोबत उकाड्यातही वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम झाले.गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, राज्याच्या उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.दोन दिवसांत परिस्थिती अनुकूलभारतीय हवामानशास्त्र विभागाने १४ जूनपर्यंत मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात मात्र १० जून रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ११, १२, १३ आणि १४ जून दरम्यानच्या कलावधीत उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह पूर्व आणि पश्चिम विदर्भातही अतिवृष्टी होणार नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे.मान्सून उत्तरी सीमा स्थिर आहे. येत्या एक ते दोन दिवसांत मान्सून विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीमचा काही भाग आणि ईशान्यकडील राज्यांच्या काही भागांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील ४८ तासांत मान्सून पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड व बिहारच्या काही भागांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
पावसाचा चकवा, अतिवृष्टीचा इशारा मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 6:23 AM