Mumbai Rain: काळजी घ्या! पुढील तीन तास धोक्याचे, अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 12:28 PM2021-06-12T12:28:36+5:302021-06-12T12:29:23+5:30
Mumbai Rain Updates: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे.
Mumbai Rain Updates: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईत आता पुन्हा एकदा पावसानं जोर धरला असून पुढील तीन तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मुंबई परिसरासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पुढील तीन तास अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ३० ते ४० किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचं काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं आणि उंच झाडाखाली थांबू नये असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
Mumbai Rainfall Update :
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 11, 2021
Moderate spell of rainfall received over Mumbai during past 3 hours.Moderate to intense spells of rain likely to continue over Mumbai and around during next 3-4 hours. Possibility of thunder lightning at isolated places pic.twitter.com/WClnTnXMRr
मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईत पावासाचा जोर पुन्हा वाढल्यानं अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना जूहू चौपाटीवर जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन
अतिवृष्टीची शक्यता असल्यानं पेरणी करु नका. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं बियाणं वाया जाऊ शकतं. दुबार पेरणीचं संकट टाळायचं असेल तर पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे. हवामान विभागानं नागपूरसह संपूर्ण विदर्भात १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.